Sunday, November 10, 2024

खेळणी!

९ महिन्यांची होत असलेल्या नातीसाठी काय खेळणी घ्यावीत याची शोधाशोध करताना माझ्याकडे खेळण्यांचा हा एवढा मोठा ढीग जमा झाला!

१. चावीची खेळणी (wind up toys) - वेगवेगळी पक्षी, प्राणी, गाड्या चावी दिली की मागे-समोर-बाजूला जाणारी तर काही कोलांटया उड्या मारणारी!  पण मला या खेळण्यांच्या बगलेतून बाहेर आलेली छोटी चावी आणि बाळाचे तोंड हे काही डोक्यातून जाईना! यातली काही पाण्यात तरंगणारी आहेत त्यांच्या पाठीवर गोलात बरोबर बसवलेली चावी असलेली आवडली कारण चावी अशी असल्याने तोंडात जाऊच शकणार नाही! त्यातलीच काही कापडाची (चावी आणि जमिनीवर टेकलेला चालणारा भाग सोडल्यास वरील भाग कापडाचा),  अंधारात चमकाणारी, दिवे असणारी, आवाज करणारी असे ही प्रकार आहेत. हे सर्व प्रकार खालील खेळण्यांत ही उपलब्ध आहेत म्हणून प्रत्येकात वेगळे नमूद केलेले नाही.

२.  रांगणारी खेळणी (crawling toys) - यात कासवे, गोगलगाई असे सरपटणारे प्राणी आधिक! वरचे सगळे प्रकार यात आहेत. यात जरा मोठे लोडाच्या आकाराचे हवेने भरलेले आणि आत वेगवेगळे आवाज करणारे खुळखुळेही आहेत जेणेकरून बाळाने त्याच्या नादाने रांगावे!

३. मागे खेचून सोडता येणारी खेळणी (Pull back) - याला वेगळी चावी नसल्याने ही आवडली! 

४. दोरीने ओढयची खेळणी (pull along toys) - ही जरा रांगणाऱ्या, बसणाऱ्या, चालायला शिकणाऱ्या बाळांसाठी छान आहेत. यात लाकडी खेळणी विशेष आकर्षक आहेत. 

५. घसरगुंडीवरून धावणारी खेळणी (roller coaster toys) - साध्या ते अगदी खऱ्याखुऱ्या रोलर कोस्टर प्रमाणे असणाऱ्या घासारगुंड्यावरून गाड्या, चेंडू सोडून दिले की हा टोल्याचा आवाज, गाडीचा हॉर्न, दिवा लावून, मध्येच हवेत झेप घेत खाली सरकन येणारी गमतीशीर खेळणी! 

६. चेंडू (ball) - इतक्या प्रकारचे चेंडू असतील असे वाटले नव्हते! यात ही रांगायला मदत होतील असे आहेतच! वरून काटेरी पण सहज दाबता येतील असेही आहेत. 

७. ठोकळे (blocks) -  प्राणी, पक्षी, अक्षरे, आकडे लिहिलेल्या वेगवेगळ्या आकाराच्या ठोकळ्यांना त्या त्या आकाराच्या भोकातून खाली असलेल्या डब्यात भरता येणारी खेळणी! म्हणजे ठोकळ्यांचा पसारा आवरताना ही मजा! यात ओबडधोबड दिसणारे पण तरी एकावर एक ठेवता येणारे लाकडाचे रंगीत ठोकळे हा नविन प्रकार दिसला.  ठोकळे वापरुन उंच उंच मनोरे बनवता येतातच आणि डोक्यावर ठेवून "दही घ्या दही दहयाला पैसा नाही.. पडलं पडलं पडलं" आहेच!

८. वाद्ये (musical instruments) - ढोल, खंजिरी, पिपाणी, त्रिकोण, खुळखुळे, झायलोफोन आणि इतर काही वाद्ये एका पोतडीत मिळतात. इतकी की बाळ नक्की आवाज करून घर डोक्यावर घेऊ शकेल! जरा अतिशयोक्ति! पण त्यातील काही लाकडाची बनवलेली अत्यंत सुबक दिसणारी आणि तितकाच छान आवाज असणारी ही आहेत! त्यात जरा मोठ्या मुलांसाठी किंवा त्यांच्या पालकांना सहज वाजवाता येईल असा दहा भोकांचा बाजा (हार्मोनिका) आणि अंगठ्याने वाजवता येईल असा पियानो (thumb piano) ही चांगला वाटला. यातच पाश्चिमात्य संगित लिपीतील स्वर ज्या पद्धतीने दर्शवतात त्या आकाराचे एक वेगळे असे जपानी ऑटोमॅटोन ही दिसले. त्याच्या खालच्या फुग्याला दाबून त्याच्या दांडीवर कुठेही बोटाने दाब दिला की व्हायोलिनला जवळ जाणारा पण त्याहून अधिक म्युट आवाज येतो. सरावाने गाणे नक्कीच वाजवता येईल पण तोपर्यंत जरा तो तितकासा मधूर वाटणार नाही.

९. रांगणे, बसणे, चालणे याच्या सरावासाठी - पडले तरी लागणार नाही अशा सॉफ्ट मॅटवर ठेवता येतील अशा आकर्षक रंगातील छोट्या (सात ते आठ इंच ऊंची पर्यंत जातील) सॉफ्ट पायऱ्या, घसरगुंड्या ही छान आहेत. जागाही खूप खात नाहित आणि वेलक्रोने एकमेकांना जोडून हवा तसा चढ उतार बनवता येतो. पण ही सगळी बऱ्यापैकी महाग आहेत. त्यापेक्षा घरीच उशा, लोड वापरुन करता येईल असे वाटू लागले. 

१०. बाहुल्या - असंख्य!

११. कपडे - असंख्य!

१२. पुस्तके - असंख्य! पाण्यात घेऊन जाता येतील अशी ही! आणि गाणारी ही! कमाल म्हणजे quantum physics, Newtonian physics पासून Blockchain for babies असल्या विषयांवरही पुस्तके आहेत! पण तसले विषय जरा अतिच!

१३. वैज्ञानिक खेळणी (scientific toys) - मला वाटलं होतं की एवढ्या लहान मुलांसाठी वैज्ञानिक खेळणी कशी असतील पण भरपूर प्रमाणात वैज्ञानिक खेळणी उपलब्ध आहेत.

शेवटी मी काय घेणार याचे उत्तर अजून मिळालेले नाही! आणि त्यातच आत्ताच आलेल्या बातमीनुसार इतर सर्व लहान मुलांप्रमाणे माझी नात ही वर्तमानपत्र हातात घेऊन त्याच्या आवाजावर हसते. थोडी मोठी झाली की खेळण्यांपेक्षा त्यांच्या रिकाम्या बोक्सेस बरोबर नक्की खेळेल! त्यामुळे सुज्ञास सांगणे ..! 


Tuesday, July 27, 2021

Backpacking / Packaged Tour

Backpacking - Requires no planning. Just hop on a public transport that will take you out of the city and get down wherever you feel like. Meet random people, roam around enjoy the nature, the place, the people, spend the day as it unfolds, check local food, accommodations without worrying about the next day, the next destination. There's no specific end date either.

Packaged Tour - Depending on the destination, planning may start as early as six months in advance, fixed dates, fixed plan for every day, every meal and every sightseeing, you be always with the group, hardly any interaction with locals but the tour operators will make you feel like an important person with full attention, no time for random excursions, the end date is also fixed. 

Play dates, planned lunches/dinners are like packaged tours. I prefer backpacking.

I'm glad that at least few houses give us the backpacking experience! 

Sunday, July 4, 2021

Unmasking...


In these COVID days, the title may mislead a reader but believe me I wear a mask myself and encourage others too! I read news that mask manufacturing industry is doing extremely well. I liked the marketing strategy of providing a matching mask / designer mask along with Indian dresses and saarees. Grading of these masks is decided based on the particle size that it can block but most are made using cotton masks. Some do not wear masks around immediate family members and COVID friends, whose immune system is trustworthy! Masks promptly get pulled up when any unknown person tries to be within six feet.

Prior to COVID days, the title might have been read differently. Long before COVID, people have been secretly manufacturing and wearing their own designer masks. For example, a designer mask while welcoming an unwanted guest is known as "अतिथि देवो भव:" mask! And the list goes on! Grading of these designer masks are based on the invisibility and plasticity! These masks are not worn around core group members who are gossip worthy! Such an unmasked group then protects itself by creating an invisible biosecure bubble which is thicker than cement blocks that can't be broken by any unknown person! If at all someone manages to break the bubble, group members immediately put on their suitable designer masks.

Enough of theory, let's look at some of my real world experiences. I do not know how but once I happened to be in an after party where I was not a member of the gossip worthy group! Whether it was my silence or the effect of few pegs, the group had forgotten about my presence! A person started telling a story about how the couple had welcomed an early morning unwanted guest by wearing "अतिथि देवो भव:" mask! They even offered a cup of coffee with invisible and plastic smiley mask. With the masks on, the couple continued to be a good host for more than two hours but never let the guest know that unhappily they had to cancel their shopping plans! My naive question, why couldn't they ask the guest to join them for the shopping revealed my presence and suddenly the topic got changed! Pushing my luck further I made a fool of myself by asking whom should be blamed if the guest wishes to repeat that great morning experience without realizing the host's agony!

Neither such masks nor a bubble existed during my childhood. I remember going with Baba, almost every weekend to see family members or his friends. In absence of phones in those days, our visits were always a surprise for the host and in absence of masks such surprises had always turned in to explosion of sudden joy and warm welcome. I happily carried forward Baba's tradition and surprised many. Later I learned that such habit is now known "Gate Crashing" or "Self Invite"!

On one Sunday around noon, I had some time at hand before the next errand so I visited a person in that area. My entry surely surprised the host as few of our common acquaintances and their families were having a lunch party. Though I was absolutely fine with the idea of they coming together without letting me know, the entire group was suddenly searching for their masks! It took a while for them to return to normalcy but by then I had to leave!

With COID around, physical masks are becoming visibly colorful, groups are becoming even smaller and more secretive about meetings - in-person or online.

Hasn't COVID taught us any lessons to be unmasked and bridge the distances by wearing a real smile with real "वसुधैव कुटुंबकम्"?

My friend Manju has put it in chaar laina /चारोळी 

MASKS

Social masks
Elude and delude
Why wear them
Why not look through them

Friday, May 7, 2021

विश्वासाच्या प्रसादाचे पुराण..

चाळीतील पंचेचाळीस - पन्नासच्या आसपास असणाऱ्या आमच्या पालकांच्या ताज्या-टवटवीत जुडीत, आम्ही पाल्य म्हणजे मरगळलेले गवत! त्यामानाने लहान वयात पालक होऊनही आमची जुडी मात्र शिळीच, पण पाल्य मात्र गवताचे भाले ठरले! असो, आत्ताचे पुराण मरगळलेल्या गवताचे!

विश्वास असण्या-नसण्याचा आणि प्रसाद मिळण्याचा संबंध जसा देवाबाबत नसतो तसाच आमच्या चमूच्याबाबतही  नव्हता. कधी आमच्या आत्मविश्वासाला "फाजिल" हे बिरूद लावून तर कधी एखाद्या कृत्यामागे आम्हीच असल्याचा ठाम विश्वास पालकांना वाटून शाब्दिक प्रसाद मिळे. वरून प्रसाद द्यायला त्या मुलाचे पालकच हवेत असाही नियम नव्हता, जो कोणी मोठा त्यावेळी उपस्थित असेल तो प्रसाद वाटप करू शेक! फक्त गणपतीत काय तो घरोघरी जाऊन प्रसाद घेण्याचे काम आमचेआम्ही आनंदाने करत असू. 

एकदा चाळीत आम्ही, "अफजलखानाचा वध" करायचे ठरवले. पण शिवाजीने एकट्याने वध करण्याच्या प्रसंगात सगळ्यांना युद्धाचा जोश दाखवायला मिळत नव्हता म्हणून त्यात थोडी फेरफार केली. तुळजा भवानीची विटंबना केल्यावर "तिथल्याच" जावळी खोऱ्यात गाठून घनघोर युद्ध करून खानाला संपविण्याचा विडा आम्ही उचलला. जावळी खोरे हे फार रोमांचकारी शब्द वाटल्याने असेल कदाचित ते मात्र आम्हाला हवे होते! एका मित्राच्या घरात तालीम करत असताना खानाने आवेशात येऊन धुण्याची काठी उलट सुलट फिरवताना तिथला देव्हाराच खाली पाडला! एकच रणधुमाळी माजली. गनिम आणि मावळ्यांत संगनमत झाले आणि खरी हत्यारे उपसली गेली. त्याच आवेशात हातोडी आणि दगडाचा जोरदार प्रसाद खिळ्यांना देऊनही देव काही त्यांच्यावर विश्वास ठेवेनात! हे प्रकरण हाताबाहेर जात आहे असे लक्षात येऊ लागल्यावर एकेकजण गनिमी काव्याने निसटू लागला. तरी आम्ही तीन चार जणं किल्ला लढवत होतो आणि तेवढ्यात खरा गनिम समोर उभा ठाकला. हे प्रकरण देवाचे असल्याने शाब्दिक प्रसादाच्या नक्कीच पलीकडे असल्याचा विश्वास आम्हाला होता. पण झाले भलतेच!

काकूंनी एकदम बसकण मारली आणि त्या रडायला लागल्या. कोणीच काही बोलेना. हातानेच त्यांनी आम्हाला निघून जायला सांगितले. ही बातमी वणाव्यासारखी बातमी पसरली. त्यांचे सांत्वन करायला इतर काकू आल्या, तरी त्या मानेनात. तोपर्यंत आम्ही कुठेतरी दबा धरून बसलो होतो. संध्याकाळी एकेकाचे बाबा येऊ लागले तसे प्रसाद खाण्याची वेळ येऊन ठेपल्याची जाणीव झाली. आज महाप्रसाद खाण्याची आम्ही तयारी ठेवली. पण त्याहीपेक्षा भयानक प्रसाद मोठ्यांनी आम्हाला दिला; 

पुढचे काही दिवस सगळ्यांनीच आमच्याशी मौन युध्द पुकारले. शाळेतून सरळ घरी येणे, खेळणे बंद करणे, अभ्यास करणे,  न सांगता घरातील कामे करणे असे तहाचे आमचे सगळे प्रयत्न फसू लागले.  काही दुसऱ्या पध्दतीने वाटाघाटी करण्याची गरज भासू लागली. नंतर अचानक त्या काकूंनी सोळा सोमवार करायचे ठरवल्याची बातमी हेराने आणली. मग दर सोमवारी आम्ही त्यांना बेलाची पाने वगैरे देत होतो. असे करता करता उद्यापनाच्या गोष्टी बोलल्या जाऊ लागल्या. सगळी मोठी मंडळी तयारीसाठी भेटू लागली. सगळ्या चाळीचा तो प्रसंग होता. उद्यापनाच्या दिवशी  तर चाळीतील प्रत्येक घरात पंगत आणि सगळ्यात पुढे मदतीला या सगळ्या गोष्टीचे कर्ते करविते आम्ही मावळे!

पहा, आम्हीच मूळ कृत्य केले होते यावर सगळ्यांचा विश्वास तर होताच आणि भरभक्कम पुरावा ही त्यावेळी समोर होता तरी आम्हाला मिळाले ते उद्यापानाच्या प्रसादाचे गोड जेवण!

म्हणून म्हटले की विश्वास असण्या-नसण्याचा आणि प्रसाद ... 


Saturday, April 10, 2021

आई आणि .. (भाग २)

१९७५ - ८० -  तसा काही मी खूप खाणारा होतो लहानपणी असे नाही पण आई जर तव्यावरची गरम गरम पोळी करत असली तर एक दोन पोळ्या नक्कीच जास्त जात! शुक्रवार संध्याकाळ आईच्या गाण्याच्या रियाजाची वेळ असे. क्लासहून घरी यायला आईला साडेआठ तरी होत. रियाजानंतर सहाजिकच आईला ही भूक लागलेली असे. मग काही तयार नसेल तर पटकन आईच खिचडी लावे. का माहिती नाही, पण मला खिचडी त्यावेळी अजिबात आवडत नसे. पोळी नाही म्हणून माझी थोडी रडरडही असे. अशावेळी आई म्हणे ती घडयाळं, पेनंं असल्या गोष्टींची जोडतोड करत असतोस ना त्यातून पोळीचे यंत्र बनवण्याची काही युक्ति शोधून काढता आली तर पहा. इकडून पीठ आणि पाणी घातले की पोळी तयार होऊन बाहेर आली पाहिजे. सगळ्याजणी तुला धन्यवाद देतील. 

२०१८ - अमेरिकेतील माझ्या मित्राने सिंगापूरमध्ये बनलेले पोळी बनवण्याचे असेच यंत्र खरोखरीचे आणल्याचे कळले आणि आईची आठवण झाली. पण तीन चार महीने वापरुन, जाडजाड पोळ्या होतात म्हणून त्याने विकून टाकले असे ही पुढे कळले. म्हणजे मला अजून संधी आहे आईसारख्या पोळ्या बनवणारे यंत्र बनवण्याची!

१९७५-८0 - "दरवेळी तबलजी मिळणे अवघड जाते कधी तरी क्लासवर येत जा की विद्यार्थ्यांबरोबर तबला वाजवायला" आई सांगत राहिली पण मी काही नियमितपणे ते काम केले नाही. तसे आईच्या ओळखीच्यातील कोणी मधून मधून येत असत पण दरवेळी त्यांच्या वेळा जमतच असे नाही. असे झाले की आईचे नेहमीचे वाक्य असे "तबल्याचे मशीन आले पाहिजे रे!" त्यावेळी आमच्या ओळखीच्या एकाने स्वतः सिंथेसायझर बनवायला सुरू केले होते. तो बऱ्याचदा आईला त्याच्या घर वजा प्रयोगशाळेत बोलावे कधी ट्यूनिंगबद्दल विचारायाला, कधी त्याला काही पुढे जमले तर ते दाखवायला आणि दरवेळी आई मला बरोबर घेई. आईही अगदी रस घेऊन सगळे करे.

१९८५ - २०१९ - साधारण ८४-८५ ला आईने त्यावेळी अगदी नवीन नवीन आलेला असा इलेक्ट्रॉनिक तबला घेतलाही! पण आता ही तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की २०१९ साली हाताने वाजवता येईल असा इलेक्ट्रॉनिक तबला इंग्लंडमध्ये निघाला आहे.   

१९९६ - १९९७ - आई बाबा अमेरिकेत आले होते. सोबत बरीच पुस्तके घेऊन आले होते. आम्ही कामावर गेलो की घरी वाचनात त्यांचा वेळ जाई. एका संध्याकाळी आईने एका पुस्तकातील काही उतारे मला वाचून दाखवले. नव उद्योजकांना मार्गदर्शन करणारे ते पुस्तक एका मोठ्या कंपनीच्या पर्सोनेल विभागात काम करून नंतर त्याविषयीच स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीने लिहिले होते. भेटलेल्या प्रत्येक माणसाचे नाव, पत्ता, कामाचे स्वरूप, कुठल्या कारणांसाठी भेट झाली, त्यातून इतर किती जणांची नावे कळली, त्यांची काही माहिती असेल तर असे सगळे ते आपल्या वहीत चार्ट काढून नोंदवत.  ह्या सगळ्या नोंदिंचा त्यांना पुढे कसा उपयोग झाला ह्याचीही माहिती पुस्तकात दिली होती.  "कम्प्युटर इंजिनियर आहेस तू तर अशा कामात नाही का रे मदत होणार?" आईच्या प्रश्नाला मी तशा इलेक्ट्रॉनिक डायरी वगैरे आहेत असे उत्तर दिले पण ते तेवढेच. 

२००३ - २००४ - अचानक "माझे नेटवर्क जॉइन कर" असे जुन्या जुन्या मित्रांचे ईमेल येऊ लागले. आता हे नवीन काय पहातो तर linkedin - कामासाठी भेटलेल्या व्यक्तींचे माहिती जाल!

फक्त लहानपणीच आई मला शिकवू पहात होती असे नाही...


Friday, February 19, 2021

आई आणि ...

ती एक छोटीशी चाळ होती. अरुंद जिना चढून वर आल्यावर डाव्या बाजूला सामाईक स्वच्छतागृहे आणि उजव्या बाजूला  घराईतक्या लांबीचा बोळ! बोळ तो ओलांडून आले की उजव्या बाजूला सामाईक गॅलरी आणि त्यात दोन दोन खोल्यांची चार  घरे. खालचा वाहता रास्ता इतका लागून की खालच्या स्टॉपवरची बस निघण्याआधी कंडक्टरने मारलेली बेलही घरात ऐकायला येई! कायम 'आमचे घर' राहिले ते श्रमसाफल्यचे घर!

गॅलरीत उभे राहिल्यावर रस्त्यावरून कोणी ओळखीचे जात असेल तर त्याला हाका मारणे नवीन नव्हते पण त्यादिवशी "ए S तुषार, ए S तुषार!" अशा आईच्या हाका अचानक स्वैपाकघरातून येऊ लागल्या. मी आणि आई दोघेच घरात असताना आई अचानक माझ्या भाच्याला का बोलवत आहे हे मला कळेना. "काय गं, काय झाले"  म्हणत मी आत धावलो, तर स्वैपाकघरात ओट्याच्या उजव्या बाजूला असलेल्या छोट्या खिडकीतून बाहेर बघत आई हाका मारताना दिसली. तिथून तर मागचे छोटे अंगण आणि त्यातले एक भोकराचे झाड सोडल्यास कुठलाच रस्ता दिसत नसे. मग आई हाका का मारत आहे हे पाहायला आईच्या मागे उभा राहून कोणी दिसते का ते पाहू लागलो. आईने हाताने ओढून मला खिडकीजवळ उभे केले आणि बोटाने एक जागा दाखवत, हाका मारणे सुरूच ठेवले! तिथे पाहिल्यावर मला आईच्या हाकेला ओ देणारा दिसला आणि ऐकूही आला. "कोण गं तो?" ह्या प्रश्नाला आईचे उत्तर आले "बुलबुल!" कावळे, चिमण्या, कबुतरानंतर आईने शिकवलेला माझा पहिला पक्षी!

खूप वर्षांनंतर सह्याद्रीच्या कामासाठी कोकणात कुठे गेलो असताना आमच्याबरोबरचे विश्वास जोशी अचानक एका लयीत  "मा S झ्या S बाळाला S टोपी S दे S रे S.. मा S झ्या S बाळाला S टोपी S दे S रे S" असे म्हणू लागले. त्यांनी केलेल्या खुणेच्या दिशेने थोडे शोधल्यावर,  त्यांना त्यांच्या आजीने हे वाक्य गाणारा दाखवलेला दिसला तो शैलकस्तुर!

बुलबुलनंतर आईने माझी ओळख करून दिली ती शीळ घालताना शेपटी उडवत एका जागेवर स्थिर न बसणाऱ्या आणि काळ्या पंखांवर पांढरी पट्टी आणि पांढऱ्या पोटाच्या दयाळ बरोबर!

आत्याकडच्या पहिल्या कोकण ट्रीपमध्ये आईने ओळख करून दिली ती निळसर किंवा मोरपिशी रंगाच्या, लांब जाड पिवळ्या चोचीच्या, तारेवर किंवा झाडावर समाधीस्थ वाटणाऱ्या पण अचानक खालच्या पाण्यात बुडी मारून नेमका मासा पकडणाऱ्या खंडयाबरोबर! तिथेच दाखवली भाताच्या शेतांतून किंवा पाणथळीतून सावकाश सावकाश चालणारी पिवळ्या चोचीची टिटवी!

आईकडे गाणे शिकणाऱ्यांपैकी  तिच्या एवढ्या असणाऱ्यांशी तिची एक खास मैत्री होई. त्यातल्याच एक डॉ. जोबनपुत्रा! त्या कुठल्यातरी एका क्लबच्या मेंबर होत्या आणि अधून मधून पक्षी बघायला ती मंडळी कुठे कुठे जात. त्यांच्याकडे एक दुर्बिणही होती. दोघींच्या गप्पात कधीकधी पक्षीही येत! त्यांच्याकडून पक्षांचे एक पुस्तक आई एकदा वाचायला घेऊन आली होती. पुढे सह्याद्रीत गेल्यावर कळले की डॉक्टरीणबाई बी एन् एच् एस् च्या मेंबर असणार आणि सलीम अलींचे

पुस्तक आईने वाचायला आणले होते! 

पक्षी जसे शिकवले तसे व्यंकटेश माडगूळकर, मारुती चितमपल्ली यांच्या पुस्तकांची ओळखही करून दिली ती आईनेच!

रोहित पक्षी मुंबईला येऊ लागल्याच्या बातम्या वाचल्यावर आईला ते पाहायची इच्छा झाली. मग एकदा आम्ही शिवडीला गेलो पण तेंव्हा काही दिसले नाहीत. एकदा ऐरोली पुलावरही ते थव्याने येत असल्याचे कळले पण आम्ही  गेलो ते फार दुरून दिसले. पण त्यावेळी एक दोन शेकाट्या आणि चिखल्याचे थवे मात्र दिसले. थवा उडताना अचानक दिशा बादलल्यावर त्यांच्या पंखांच्या खालचा राखाडी भाग एकदम चमकून दिसलेला आईला आवडला. 

परवा अचानक स्वैपाकघरातून दिसणाऱ्या झाडावर पंधरा वीस पक्षी दिसले म्हणून लय ओवीला हाक मारली त्यांचे फोटो काढले. आम्ही नंतर शोधले तर ते waxwing आहेत असे कळले. 

नवे चक्र सुरू झाले!

Saturday, December 26, 2020

देणाऱ्याने देत...

"नाही मी हे घेऊ शकणार नाही! देणाऱ्याने देत जावे... ह्या माझ्या आवडीच्या कवितेला वेगळा अर्थ देऊन तुम्ही मला कितीही पटवायचा प्रयत्न केलात तरी नाही!" स्वानंद त्याच्या मतावर ठाम होता.
करोना काळात त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकदम घरोबा असणाऱ्या सात-आठ जणांचा ग्रुप ऑनलाईन जमला होता.

"आम्ही तुझी मतं जाणतो, पटत नाहीत तरी तुझ्यापुरती पाळतो, तुला काही देणं बंद केले आहेच पण आता ह्यावरून तुझ्याशी वादही घालत नाही! त्यामुळे तुमचे चालू द्या. मी logout करतो. पुन्हा एकदा तुला शुभेच्छा!" असे म्हणून एकाने मीटिंग सोडली. त्याची री ओढत आणखी दोघे तिघे निघाले.

पण ह्यावेळी ज्यांनी भेटवस्तू पोस्टाने पाठवल्या होत्या त्यांनी आणखी किल्ला लढवायचा असे ठरवले होते.

त्यांनाही स्वानंदची मते माहिती होती. तो ही कोणाला भेटी देत नसे, स्वतःसाठीही काहीही नवीन घेत नसे आणि त्यामागे कांजुषपणा नसून पर्यावरण प्रेम, वस्तूंचा पून:वापर, कमीत कमी गरजा, आहे त्यात भागवणे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे अती प्रचंड वेगाने वाढतच चाललेल्या मटेरियलिस्ट जगाची गती कुठेतरी मंद करण्याची त्याची ही स्वतःची पद्धत!

"भेटवस्तू नाकारून तू आम्हाला दुखवत आहेस त्याचे काहीच कसे वाटत नाही तुला? आणि तसेही घरगुती वापराच्या वस्तू आहेत, महागही नाहीत!" उरलेल्या लढवैयांपैकी एकाने भावनिक शस्त्र उपसले.

अनेक वर्षांच्या विचारांवर आधारित स्वानंदची कृती असल्याने अशा प्रहरांना त्याच्याकडे ढिगाने उत्तरे तयार होती "देणाऱ्याच्या भावना आणि माझ्या? खरेदी करण्याआधी तुम्ही आधी आपल्याच ग्रुपमध्ये ह्याच गोष्टी कोणाकडे जास्तीच्या आहेत का, देऊन टाकायच्या आहेत का असे काही विचारले तरी का?"

"आपण एकमेकांसाठी, सभाठी स्वतःसाठी खूप घेतले, आता द्यायची वेळ आली आहे. माझ्यावर प्रेम आहे ना, मग एक काम करा. त्या  कवितेती शेवटची ओळ; 'घेता घेता एक दिवस ...' हे खऱ्या अर्थाने सार्थ करायचा एक मार्ग मी सांगतो. शालेय वस्तू, वाणसमान वगैरे आवश्यक गरजा सोडल्यास इतर काही स्वतःसाठी किंवा भेट म्हणून विकत घेण्याआधी एकमेकांना विचारून; वस्तू विकत न घेता ती गरज भागवता येते का ते पाहू. नाही भागली तर ती वस्तू विकत घेणे टाळू. निदान वर्षभर तरी टाळू! ह्यात अधिकाधिक मित्र-मैत्रिणी नातेवाईक जोडता आले तर पाहू. जे पैसे वाचतील त्याची नोंद ठेवून; वर्षाअखेर जमलेल्या रकमेइतकीच भर मी घालून आपण एखाद्या संस्थेला देऊ. तुम्ही देणगी देताच पण असे पैसे वाचवून आपण आणखी देऊ शकतो. जिथे गरज आहे तिथे आणखी देण्याचा वसा आपण उचलू. आहे कबूल?"
प्रश्न करून तो थांबला आणि नेमकी ऑनलाईन फ्री मीटिंगची वेळ संपली.

ता. क. अधिक चौकशी केल्यावर असे कळले की स्वानंदने त्याला आलेल्या दोन तीन भेटवस्तू परत देऊन टाकल्या आणि तो अजून मित्रांच्या उत्तराची वाट पहात न थांबता नेहमीप्रमाणे एकला चलो रे करत आहे!

Monday, December 14, 2020

.. की मुझे स्ट्रेस नही था!

एकेकाळी जावयाला राव असे संबोधले जाई. काळ बदलला तसे राव जाऊन भाऊजी आले पण एक वेगळा दबदबा मात्र तसाच राहिला आहे. गुजराती लोकं जावयाच्या नावामागे, अवघे पाऊणशे वयमान असले तरी; कुमार जोडून कायम तरुण ठेवतात आणि चेष्टा मस्करीत ओढून घेतात.
दोन्हीतील फरक हा काही आजचा आपला विषय नाही; विषय आहे माझ्या गुजराती मेव्हण्याचा आणि आमच्या दोघांच्या अनोख्या नात्याचा! माझ्या नावामागे कुमार न लागताच मला पाहिल्या दिवसापासूनच अरे तुरे वर आणले गेले! तसा तीन दिवसांनी मी मोठा बाकी मोठा तोच!
माझ्या मुलीच्या वाढदवसानिमित्त आमचा आणखी एक मित्र, मेव्हणा, त्याची बायको असे सगळे जमलो होतो. काहीतरी बोलणे झाले आणि माझे बालपण किती स्ट्रेस मध्ये गेले आहे आणि माझ्या मेव्हण्याचे आणि माझ्या बायकोचे बालपण किती सुखात गेले आहे असे मी म्हटले.

आमच्या कडे फार उशिरा टीव्ही आला तोपर्यंत मी इतरांकडे जाऊन विचारे की आज टीव्ही लावणार का? आमच्या ठराविक ठिकाणी टिव्ही लागणार नसेल तर आमचा मोर्चा दुसरीकडे वळे! तिथे तर ते लोक खिडकीचा पडदा उघडून ठेवत आणि गटाराच्या कडेला उभे राहून आम्ही टीव्ही बघत असू. एकीकडे डास मारणे तर एकीकडे चौकार षटकार मारल्यावर मित्रांना टाळ्या! आमच्या नेहमीच्या ठिकाणी सिनेमा पाहायला घरात घेतले तरी सिनेमाच्या मधल्या वेळेत मात्र त्यांना जेवायचे असे म्हणून आम्हाला घरी जायला सांगितले जाई! आमच्या मित्राने ही लहानपणी असाच कुठेतरी जाऊन टिव्ही वर सिनेमा पाहिलेला आहे हे माहिती होते म्हणून त्याला माझ्या बाजूने घेण्यासाठी म्हटले की बघ ना, त्या वयात किती ही नाचक्की सोसली आपण, नाही तर किती सुखात गेले ह्यांचे बालपण कारण ह्यांच्या घरी आधीपासून टीव्ही! यांचे  बालपण म्हणजे अगदी अमूल बटर, स्ट्रेस फ्री!
परतून वार येण्याआधी आमचा फोन ही किती उशिरा आला आणि ज्यांच्या कडे फोन येई ते शेजारच्या इमारतीत पाचव्या मजल्यावर रहात. तिथून ते ओरडून आमच्या चाळीतील शेवटच्या घरातील कोणाला तरी निरोप देत मग ते आमच्या कडे येऊन आम्ही धावत फोन घ्यायला जात असू. आणि यांच्याकडे सगळ्यात आधी फोन आला! अशी सगळी राम कहाणी सांगून माझ्या बटर ला आणखी खमंग पणा आणला!

आता मात्र मेव्हण्याने शाब्दिक शस्त्र उगारत म्हटले "एकदा धावलास तर इतका स्ट्रेस होई असे सांगत आहेस पण दिवसातून असे चार चार निरोप देण्यासाठी  की मी स्वतः तिसऱ्या मजल्यावरून खाली वर असे आमच्या आणि बाजूच्या इमारतीत धावत असे.  "और इसे लगता है की मुझे स्ट्रेस नही था" !

माझे बटर त्याच्या आवडीच्या विब्स पावावर लावून तो मजेत खात आहे असे मला वाटले. मी सावरणार तोच त्याने दुसरा वार केलाही! प्रसंग होता त्याच्या आणि त्याच्या बायकोच्या कॉलनीच्या टीमची तिच्या घरासमोर खेळली जाणारी क्रिकेटची मॅच! "आमचा पहिला खेळाडू आऊट झाल्यावर मी खेळायला आलो. इसको भी लगा चलो अपना हीरो आ गया! तशी आमची टीम ठीक होती पण यांची मात्र जोरदार होती. मला बाउंडरी, फील्डर्स दिसण्याआधी समोर बसलेले सासू सासरे दिसत होते! नेमका समोर अती वेगवान गोलंदाज! पण त्या दिवशी माझ्या इभ्रतीचा प्रश्न होता. मी स्टांस घेतला, तो धावत जवळ आला आणि एकदम थांबला असे वाटले. त्याच क्षणी एक जोरदार कळ येऊन मी अचानक ताठ झालो आणि आपसूकपणे हात मागे गेला. माझ्या पार्श्वभागावर काहीतरी जोरात आपटले असे वाटले. गोलंदाजाला चेंडू परत दिला तेंव्हा मला कळले की जे आपटले तो बॉल होता!" जमलेले सगळे हसले म्हणून त्याने लगेच म्हणून टाकले "और इसे लगता है की मुझे स्ट्रेस नही था! मी परत स्टांस घेतला. तो धावत आला, त्याने बॉल टाकला माझे पूर्ण लक्ष बॉलकडे होते, मी पाय पुढे टाकून एक छानपैकी लॉफ्टेड ड्राइव मारला आणि शॉटच्या दिशेने पाहू लागलो. प्रेक्षकांतून  जोरात  आवाज आला आणि दुसऱ्या टीमचा जल्लोष पाहून मी गोंधळात मागे पाहिले तर माझी मधली यष्टी चांगली वीस फूट दूर जाऊन पडली होती! सांसाऱ्याच्या चेहऱ्यावर लल्लू, बॅट नही संभाल  सकता मेरी लडकी को क्या संभालेगा असा भाव होता! विचार कर माझे काय झाले असेल! और इसे लगता है की ... !" हे होतेच!

खरे तर बॉल लागून त्याचा पार्श्वभाग शेकला गेला होता, तो शून्यात आऊट झाला होता हे सगळे असतानाही इथे  यशश्री त्याच्या गळ्यात आणि मी माझ्याच होम ग्राउंडवर पराभवाची धूळ चाखत होतो! पण एवढ्यात मी हार मानायला तयार नव्हतो!

आमचाही प्रेम विवाह! त्याने त्याच्या लग्नाच्या आधीची गोष्ट सांगितल्याने मी ही माझ्या लग्नाच्या आधी हिने माझी फजिती कशी केली होती ते सांगितले. पण माझा प्रसंग इतका बसका निघाला की माझ्याच बटरवरून मीच घसरून भुईसपाट झालो होतो. आमच्या मित्राने ही आता त्याची बाजू घ्यायला सुरवात केली होती!

तरी लगेच "ते जाऊ दे तुला त्या गोलंदाजाने एकदा धुतला, मला आमच्या घरी, शेजारी जाता येता धूत!" "शेजारी तर होतेच पण एकदा मी माझ्या मोठ्या बहिणीला त्रास देत होतो तर तिने आमच्या कामवाली बाईला सांगितले आणि कपडे धुताना ती तशीच बाहेर आली मला बाथरूममध्ये घेऊन गेली आणि दोन्ही गालावर दहा बारा थपडा लगावल्या आणि उचलून परत बाहेर ठेवून दिले! मार बऱ्याच जणांनी खालेला असतो पण असा बाईच्या हातचा मार? मला नाही वाटत!" मला माहिती होते की माझ्या  सासू सासऱ्यांनी ह्या दोघांना कधी ही मारलेले नाही आणि त्याच्या बायकोला ही लहानपणी धाक होता ते, म्हणून तिला टाळी देऊन मी तिला माझ्या बाजूचे करून घेतले. तिने ही "हो हे मात्र खरे की ह्यांचे बालपण ह्या बाबतीत तरी अगदी चौकोनी होते!" माझा किल्ला मी जोरात लढवला ह्यात शंका नव्हती!

"अरे तुला त्या बाईने हाताने घरात एकदा मारले म्हणजे जिवावर काही बेतले नव्हते तुझ्या" असे म्हणत तो वार करण्यास सरसावला! "मी आणि माझी बहीण भाड्याने सायकल घेऊन फिरवत फिरवत चुकून आमच्या जवळच्या अशा वस्तीत गेलो की तिथे सगळेच भाई! प्रत्येकाचे फोटो पोलिस स्टेशनवर लागलेले! तिथे एक एवढासा पोरगा आमच्या जवळ आला, अचानक सायकल थांबवली आणि सरळ चाकू दाखवून पैसे मागू लागला! खिशात सायकलच्या भाड्याचे पन्नास पैसे होते ते त्याला दिले आणि धूम ठोकली दोघांनी! चाकू! विचार कर भाजीचा चाकू सोडून दूसरा कुठलाही चाकू पाहिलास तरी होतास का तेंव्हा? अरे घरी येऊन पैसे घेऊन सायकल परत करेपर्यंत उशीर झाल्याने आणखी वीस पैसे दंडही लागला होता तेंव्हा" 

मी ही माझ्या पतंगाला ढील दिली! "एकदा बाजूच्या गच्चीवर पतंग उडवत असताना काटाकाटीत कोणीतरी रस्त्यावरून उडवणाऱ्या मुलांचा पतंग कापला. आम्ही सगळे जल्लोषात! तेवढ्यात गच्चीत अचानक भीमा प्रगट झाला! भीमा, असेल आमच्यापेक्षा पाच सहा वर्षेच मोठा पण तो होता बाजूच्या वस्तीतील दादा! त्याला बघताच आपापले पतंग टाकून कोणी पटकन जिन्याने सटकले तर कोणी पाण्याच्या टाकीखाली लपले. असा आरडा ओरडा केला त्याने की सगळे जमले म्हणून आम्ही सुटलो!" अर्थात भीमाने चाकू वगैरे काढला नसल्याने माझ्या मांजात तितकी धार नव्हती!

माझ्या बाजूने असणारी त्याची बायको आता हळूच त्याला सामील होत म्हणाली "अरे, तुझे ते प्रिंटिंग प्रेसवाल्याचे सांग ना!" आणि तो ही सुटला! "इंजिनियरिंग नंतर बिझनेस करायचा म्हणून आम्ही ठरवून व्हिजिटिंग  कार्डस् करायला दिली. दोन तीन दिवसांनी गेलो तर माझ्या निळ्या रंगाऐवजी त्याने कुठला तरी हिरवा आणि अगदी घाणेरडा रंग, फॉन्ट वापरला होता. माझी मूळ प्रत त्याला दाखवत परत सगळी कार्ड छापून द्यायला त्याला सांगितले. आतून एक दूसरा माणूस आला ती कार्ड हातात घेतली आणि विचारले काय झाले ते. माझे परत सगळे सांगून झाल्यावर अचानक मी जो हेलपांडलो आणि आपसूकपणे गालावर हात चोळत सावरायचा प्रयत्न केला. काय झाले ते कळलेच नाही! दुसऱ्यांदा त्याने नुसती हूल दिली म्हणून मी वाचलो तरी! चूपचाप पैसे देऊन मी घरी परतलो. हिच्याकडे रडलो आणि एक अगदी लोकल जिम जॉइन केला. दुसऱ्या दिवशी व्यायाम करत असताना अचानक राडा झालाय, राडा झालाय असे सांगत काही मुले जमली सगळ्यांच्या हातात जाड जाड चेन होत्या, एकाने माझ्याही हातात चेन दिली आणि ठरले की तिथल्या सगळ्यांनी लगेच निघायचे आणि काम निपटायचेच आज. कसले काम, काय काम काही अंदाज येईना. परवाचा दुखरा गाल आठवला आणि जेमतेम पळ काढला तिथून! और इसे लगता है की ... !" हे होतेच!

"अरे मुलीच्या जन्मा नंतर मी गाडी पार्क केली होती अगदी तुझ्या इमारती जवळ" असे म्हणत मी माझी गाडी दामटली! "परत येऊन पहातो तर पानवाल्याने त्याच्या दुकानासमोर मी गाडी लावली म्हणून चाकातील  हवा काढली होती. भांडणे झाली. तुझे मित्र ही तिथेच माझी चेष्टा बघत उभे होते. मग सगळे लटांबर पोलिस स्टेशनला. ते सगळे दुकानदार आणि मी साधा माणूस! इन्स्पेक्टर ने लगेच ओळखले कोण स्थानिक कोण नाही. एक जोरदार शिवी हासडून, हात उगारला, भरपूर बोलला आणि माझी चूक नसतानाही मला वाट्याला लावले." माझ्या कानाखाली वगैरे बसली नसल्याने माझ्या गाडीच्या चाकासारखी माझ्या प्रसंगाची हवा निघून गेली होती. 

मी काही बोलणार तोच पहिल्यांदा गाडी चालवण्याचा प्रसंग त्याने सुरू केला! गावाला कोणाच्या तरी लग्नानंतर घरातील बायकांना हॉलवरून परत घरी घेऊन जायचे होते. त्याच्या काकाने ह्याला विचारले की तू गाडी चालवतोस ना तर ह्यांना घेऊन जा! "बाइक चालवत होतो पण त्या आधी मी फक्त एकदा गाडी चालवली होती. सगळे गाडीत बसले, मी एकदम शान मध्ये! गप्पा मारत मारत गाडी चालवत होतो. तेवढ्यात मागून एका काकीने आवाज दिला अरे समोर बघ समोर बघ, बोलता बोलता मी दुसऱ्या लेन मध्ये गेल्याने अचानक समोरून येणाऱ्या बाइक वाल्याला रस्त्यावरून खाली उतरावे लागले होते! मी परत गाडी ह्या साईडला आणली. मग काही झाले नाही. सुखरूप घरी पोचलो. लोकं बसली होती. गप्पा चालू होत्या तेवढ्यात एक शर्टाला माती वगैरे लागलेला माणूस घरात आला आणि थेट मला हेरून माझी कॉलर पकडली आणि सणसणीत कानाखाली लागावली! सगळे मध्ये पडले माफी मागितली आणि माझी सुटका झाली! काकाने नंतर मला सांगितले की तो एक स्थानिक राजकीय नेता आहे, एका लाफेत निभावले आणि तू जिवंत आहेस ह्याचे मला आश्चर्य आहे!"

मी सावरायच्या आतच पुढचा प्रहार झाला! "हनिमूनला चेन्नईला गेलो होतो. एक तर भाषा येत नाही आपल्याला आणि ते हिंदी बोलत नाहीत. अशात एका रिक्षावाल्याने तासभर फिरवून अंधारात हॉटेलजवळ रिक्शा उभी केली. आतून एका बाजेवर बसलेले अत्यंत तर्र झालेले चार जण आले, पांढरी लुंगी वर करत घोगऱ्या आवाजात काय म्हणून विचारले. तिथून जावे म्हटले तरी वस्ती पासून खूप दूर होतो म्हणून खोली हवी असे सांगितले. त्यांनी तिरस्काराने पहात वर यायला सांगितले. रात्रभर तिथे खोलीत जे मिळेल ते दारवाज्यामागे लावून जागून काढली. और इसे लगता है की ... !" हे होतेच!

मग तो अमेरिकेत असेच कुठे फिरायला गेला असताना हॉटेल मध्ये त्यांचा नंबर आधी असून ही एका वेगळ्या ग्रुपचा  आधी नंबर लावला म्हणून काउंटरवर विचारले तर थातुर मातुर उत्तर देऊन वाटेला लावले. वैतागून निघत असतानाच त्या ग्रुप मधील एका माणसाने येऊन त्याला बाहेर बोलावले आणि मागील बाजूला नेऊन भिंतीवर दाबून चक्क चाकू बाहेर काढला की आम्ही स्थानिक आहोत तू बाहेरून आला आहेस जास्त आवाज करू नकोस! 

सगळे हसत होतेच! सारी दुनिया एक तरफ औरजोरू का भाई एक तरफ असे मी ही म्हणतो पण फरक इतकाच आहे की मी मध्ये बसून दोन्हीकडचे फटके खात आहे असे मला वाटू लागले.

ते झाल्यावर अमेरिकेतच एका माणसाने भिती वाटे पर्यंत मागे लागून कसे हैराण केले ते झाले, तिथल्याच जिममधील एका माणसाने कसा दम भरला ते झाले. मला वर्तुळाचे केंद्र व्हायला अगदी आवडते आणि हवे असते पण इथे मी तर चक्री वादळाचे केंद्र बिंदू बनलो होतो; म्हणजे बाकी सगळे पोट धरून हसत होते आणि मी तितकाच शांत शांत पडत होतो!

अनेकदा त्याच्या गालावर थप्पड बसली होती, त्याला दम दिला गेला होता पण इथे प्रत्येक प्रसंगाच्या शेवटी समेवर आल्यासारखे "और इसे लगता है की मुझे स्ट्रेस नही है" असे म्हणत माझ्या पाठीवर थाप मारत पाठ लाल करत होताच पण माझा चेहेराही पडत होता!

एकत्र जमणे कायमचे लक्षात ठेवण्यासाठी जास्तीत जास्त हास्याची कारंजे उडली पाहिजेत खरी पण इथे तर त्या कारंज्याखाली बिरबलाच्या गोष्टीतील माकडीणीच्या पिल्लाप्रमाणे माझी गत झाली होती! माझी हार स्पष्ट होती!

तरीही आम्ही परत एकत्र येऊ वेगळ्या विषयावर परत असेच घडेल आणि परत एकदा मी नामोहरम होईन! ही साखळी कधीही तुटणार नाही ह्यातच माझ्या पराभवाचा आनंद आणि आमच्या नात्याचे गुपित दडले आहे!

त्याला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा!

Wednesday, July 29, 2020

SB Trails

These are some of the trails/hikes around Santa Barbara. The order does not indicate a particular preference.

1. Stevens Park - N. Ontare
Simple Hike, narrow trail but no valley - (2.6 miles out and back (roundtrip), 400 ft elevation,) - Most part has tree shade.

Continue the same trail from N. Ontare to Northridge (Additional 1.2 miles out and back 700 ft elevation)

Both these trails are also accessible from Jesusita Trail Head reducing the distance to half.

Directions from Stevens Park - https://bit.ly/3108yfN
Directions from  Jesusita Trail Head  - https://bit.ly/310wkYZ

2. San Antonio Creek Trail - Hwy 154
Simple walking wider trail (3 miles out and back 300 ft elevation) - Most part has tree shade. 

3. Cold Spring Trail
Moderate Hike with good change of terrain (hill, creek) (Though it is long one can decide to return from any point till there is good tree shade). 750 ft elevation. Narrow trail. Better to have 2 people.

4. San Marcos Foothill Preserve 
Simple hike wider trail (3.2 miles out and back 250 ft elevation. No Tree cover at all. Grassland terrain.

5. Douglas Family Preserve
Walking Trail system on a hilltop by the ocean. Wider trails. No hike. Good for a day picnic.
Directions - https://bit.ly/2Pdcap7

6. Arroyo Burro Hike
Hard, steep, best to test stamina (11.2 miles out and back 3000 ft elevation) and best of the list. Start early (7am) to avoid trekking in dark on the way back. At times one may feel lost after about 300 feet downhill, but the fun begins from there with the forest cover. Sudden cooling at some spots makes one realize the importance of trees and streams. Recent rains have activated the streams. 
Directions from  Jesusita Trail Head  - https://bit.ly/381aNnK

Tuesday, January 14, 2020

न दिसणारे...

माझ्या चुलत भावाला त्याच्या पहिलीतल्या मुलीची सध्या खूप काळजी वाटत आहे. तशी ती मुलगी आनंदी, चुणचुणीत आहे पण मध्येच कधीतरी वेगळ्याच विश्वात गेल्यासारखी वावरते, न दिसणार्‍या लोकांशी, वस्तूंशी गप्पा मारत बसते, ते ही कित्येक वेळ! तिला हलवून परत आणावे लागते इतकी ती तिच्या विश्वात रमते!

शाळेतून ही तक्रारी आल्या. डॉक्टरांनी मानोसपचार तज्ञांकडे घेऊन जायला सुचवले आणि माझा चुलत भाऊ व्याकूळ झाला.

डॉक्टरांकडून घरी परत येताना त्याला देऊळ दिसले म्हणून तो आत गेला! त्याने मागितले काही नाही पण मन शांत करून आला....न दिसणार्‍या देवापाशी!

Friday, January 10, 2020

नक्की ओळख पटेल...

माझ्या एका बहिणीने कर्नाटकातील एका जंगलातून फिरून आल्यावर मला छान वर्णन लिहून कळवले. पण एकही पक्षी ओळखता न आल्याबद्दल तिला वाईट वाटत होते. म्हणून तिला मी हे उत्तर दिले...


तो आवाज, ते रूप, ती लकब दाखवून तो गेला
मीच बसले शोधत त्याचे नाव गाव पत्ता!
मग कळले, नाव सांगायला तो आलाच नव्हता
जे द्यायचे होते ते देऊन तो गेला!

पण आलाच जर परत तर नक्की ओळखेन,

मी त्याला आणि तो मला!

Sunday, August 18, 2019

It takes a village...

"पण मला हो म्हणून ही तू का आला नाहीस, ते आधी सांग"

"मी येतो असे म्हटलेच नव्हते. त्या तीन दिवसांच्या ट्रीपला मी येत नाही म्हणून सुद्धा तू परत परत आग्रह करतच राहिलास म्हणून मी फोनवर तुला म्हटले की बरं तू मला संगीतलेस आणि मी ऐकलं!"

"हे आता तू शब्दाचा कीस पाडत आहेस. इतक्या वर्षांनी माझ्या शब्दाला तू किती महत्त्व देतोस ते कळले. आणि तू आला नाहीस म्हणून तुझी धाकटी मुलगी ही घरी थांबली."

"पण तुला हे माहिती आहे का की तिने बॅग ही भरली होती. शेवटच्या दहा मिनिटे आधी तिचा तिने निर्णय बदलला. आम्ही सगळ्यांनी तिला समजावले. मी तर तिच्या एकटीशी ही बोललो की आई आणि ताई ही जात आहेत, तुझ्या आवडीचे दोन्ही काका आहेत, इतरही बरीच मुले आहेत, समुद्र आहे, तुला नक्कीच मजा येईल, तर तू जावेस असे मला वाटते. मी तिला असे ही विचारले की मी गेलो असतो तर? त्यालाही तिने चक्क नकार दिला होता आणि वर म्हणाली तू जा ना मी रहाते एकटी!"

"पण तू आला असतास तर तिला काही पर्याय राहिलाच नसता. तशी ही ती एकटी एकटी रहाते. गप्पा मारत नाही. अशा ट्रिपमधून तिला ही चार लोकं भेटले असते, नवी मैत्री झाली असती. पण तुला तुझ्या मतांच्या पलिकडे मुलीचा विचार करावा असे ही वाटले नाही."

"आता तू सगळे खापर माझ्यावर फोडतो आहेस. मी तुला सांगितले की मी तिला समजावायचा प्रयत्न केला म्हणून"

माझ्या दोन मित्रांचे हे संभाषण पुढे जाईना तेंव्हा अचानक माझी साक्ष काढण्यात आली!

"तू गप्प का? तुला वाटत नव्हते का ह्याने यावे असे? मुलीसाठी तरी ह्याने स्वतःचा हेकेखोरपणा जरा बाजूला ठेवायला हवा होता की नाही?"

खरे तर तो घरी राहिला ह्याचे मला जराही नवल वाटले नव्हते आणि त्याची मुलगी ही अगदीच लहान नाही चांगली सातवीत आहे. थोडी लाजते, बुजते पण ओळख असेल तर बोलते. माझा मित्र जरी सगळ्याच गॅदरिंगला येत नसला तरी ती दरवेळी तिच्या आई आणि ताईबरोबर येते  सगळीकडे. ह्याचवेळी तिने असे का केले आणि त्यात माझा मित्र न येण्यामुळेच असे झाले असेल का हे सांगता येणे कठीण होते. पण माझ्या दुसऱ्या मित्राचा राग खरोखरच त्या मुलीला विचारात घेऊन होता की आमचा मित्र त्याची मर्जी असल्याशिवाय नुसते आम्ही म्हटले म्हणून कुठे ही येत नाही ह्यावर होता हे ही मला कळत नव्हते. ह्या संभ्रमात मी कोणाचीच बाजू घेऊ इच्छित नसल्याने नुसताच सुस्कारा सोडला.

तरी माझे मत गृहीत धरून मित्राने परत तोफ डागली!
"हे समजून घे की तुझी मुलगी डीट्टो तुझ्यासारखी होत आहे. पुढे जाऊन तुलाच त्रास होईल. एक लक्षात घे की पालकांच्या चुकांमुळे मोठी होऊन मुले ही चुकीचे निर्णय घेतात. हल्लीच मी एक रिपोर्ट वाचला त्यात ड्रग घेण्यामागे मुलांबाबतचे पालकांचे चुकीचे निर्णय हे ही एक कारण दिले आहे. तू जे सारखं ऐकवतोस ना की जबरदस्ती न करता दरवेळेस मुलांना पाहिजे ते तुम्ही करू देता, बघ ती मोठी होऊन समाजात वावरताना भांबावेल आणि इतर प्रॉब्लेम झाले की तुलाच ब्लेम करेल तेंव्हा कळेल!"

आता मात्र मी मधे पडलो "अरे तू एकदम टोकाला जात आहेस. त्याची मुलगी चांगले गाते, भरपूर वाचते, गणितात ही चांगले करत आहे. हे सर्व आई बाबा तिला वेळ देतात म्हणूनच शक्य आहे ना! आणि ती ह्याच वेळी आली नाही. आपण एवढी तिची काळजी करत असू तर त्यासाठी काही ऍक्शन घेतली नाही तर ह्याला नुसतेच वॉर्न करून सोडले तर आपण आपली जबाबदारी झटकून टाकली असे होईल. आपण ह्याला शिक्षा देण्यासाठी ह्याच्या घरीच ट्रिप नंतरचे गेट टुगेदर करू. परत मुलं ही एकत्र येतील आणि एकत्रितपणे फोटो ही बघू मस्त! म्हणजे तिलाही कळेल तिने काय मिस केले ते!  शेवटी म्हटले आहेच की it takes a village to raise a child!"

Monday, July 22, 2019

माझी परिक्षा...

माझ्या एका तरूण मित्राच्या ऑफिस ग्रुपबरोबर अभयारण्य बघायला जायचा बेत ठरला. माझी तयारी करून भेटीच्या ठिकाणी ठरल्यावेळी पोचलो. एकेक करून माझ्या मित्राच्या मित्र-मैत्रिणी आणि त्यांची लहान लहान मुले येऊ लागली. बघता बघता ३५-४० जणांचा गट जमला. निघे तोपर्यंत जुजबी ओळखी झाल्या. त्यातल्या काही जणांची निसर्गभ्रमंतीची ओढ पाहून मला आनंद वाटला. दळ मोठे असले तरी वेळेवर हलले! अभयारण्यात शिरेपर्यंत  साडे अकरा वाजले.

आता दरीतून खळखळत वाहणारी नदी दिसू लागली. अडीच तीन हजार फूट खोल दरीच्या बाजूने जाणार्‍या रस्त्याला दुसर्‍या बाजूच्या तेवढ्याच वर उंच चढलेल्या डोंगराने पोटात घेतल्याप्रमाणे वाटत होते. रस्याला लागून एका भल्या थोरल्या खडकाजवळची गर्दी पाहून आम्ही ही थांबलो. त्या खडकाचा गडगडत जाण्याचा प्रवास एकमेकांपासून दोन हात दूर असणार्‍या असमान उंचीच्या दोन छोट्या बुरुजांनी रोखला होता. रस्त्यापासून खडकाचा तळ दहा बारा फूट वर तर माथा चांगला तीस पस्तीस फूट तरी उंच वाटत होता. खडकाची रस्त्याकडची बाजू भल्या थोरल्या घसरगुंडीसारखी दिसत होती. खडकाला पादाक्रांत करणार्‍या वीरांमुळे डाव्या बुरुजाच्या बाजूने खडकाच्या माथ्यावर जाणारी एक पायावाट तयार झाली होती. आमच्या ग्रुपमध्येही बरेच मावळे होते. माथ्यावरून वेगवेगळ्या पोझेस देणार्‍यांचे फोटो काढण्यापेक्षा त्यांना खालून सांभाळायला सांगणार्‍या त्यांच्या घरच्यांच्या पोझेसचे आणि चेहर्‍याचे फोटो काढण्याचा मोह मला आवरला नाही! वर जाण्यापेक्षा त्यां दोन बुरुजांच्या मधून जाणार्‍या पायवाटेवर उभे राहून मी त्या खडकाला खालूनच जोखले. पायवाटेवर पुढे जाऊन मागच्या बाजून दगडाचे फोटो काढताना दुसर्‍या बुरुजाच्या आणि खडकाच्या खबदाडीत कधीतरी वापरले गेलेले घरटे ही दिसले. वर्दळ सगळी खडकाच्या समोर, डाव्या बुरुजाजवळ आणि त्याच्या माथ्यावर, घरट्याची जागा निवडणारा पक्षी हुशार!

थोड्या वेळाने जेवणासाठी आम्ही एका ठिकाणी थांबलो. वेगवेगळ्या पदार्थांनी भरलेली माझी थाळी गप्पा ऐकता ऐकताअ संपली. सगळे आवरून, काहींचे फोटो सेशन संपवून, तासाभराने पुढचा प्रवास सुरू झाला.

वळणावळणाचा रस्ता डोंगर माथ्याकडे चालला होता. आजूबाजूला महाकाय डोंगर रांगा होत्या. एका खिंडिनंतरच्या वळणानंतर डोंगरात एक मोठी घळ होती आणि तिथे तुषारांवर इंद्रधनुष्य दाखवत एक धबधबा बोलावत होता. आम्ही तिथे न थांबतो तरच नवल होते. परत एकदा फोटो सेशन झाले. तीस चाळीस फुटांवरून पडणारे पाणी दगडांवर आपटत, फेसाळत पुढे जात होते. धबधब्याच्या खाली जाणे तर शक्यच नव्हते. शक्य तेवढ्या जवळ जाऊन थंडगार पाणी अनुभवून मी बाहेर आलो आणि किनार्‍याला लागून असलेली वेगवेगळी जंगली फुले पहात होतो. प्रवाहाच्या दिशेने थोडे पुढे गेल्यावर जांभळ्या रंगाच्या जंगली फुलांच्या छोट्या गालीच्याने माझी वाट अडवली. मध्येच एखादी एखादी निळी गुलछडी ही उभी होती. मग मला आठवले की वाटेत काही काही डोंगर उतार मधे मधे जांभळ्या रंगाचे दिसत होते ती हीच फुले असणार!

सगळे होईपर्यंत पाच वाजले. काहींचे डोके दुखू लागले होते तर काहींना अंधाराच्या आत परतायचे होते तर काहींनी लहान मुलांची कारणं देत मुक्कामापाशी परत जायची टूम काढली. दुसर्‍या दिवशी परत उठून आणखी काही ठिकाणे पहायची होती. त्यामुळे परतीच्या मागणीकर्‍यांच जय झाला.

पहिल्या दिवशी तरी अभयारण्यातून फार काही न पहाता परतावे लागत असल्याने मी थोडा अस्वस्थ होतो. एकंदरीत मोठा ग्रुप, वेगवेगळा वयोगट, वेगवेगळी आवड ह्यामुळे असेल आणि उद्याचा दिवस ही आहेच असे म्हणून मी मनाचे समाधान करून घेत मागे पडणारा निसर्ग पाहू लागलो. दोन डोंगरच्या उतरणीपैकी एकाच्या मागून एक भला थोरला सुळका वर आला होता आणि त्या सुळक्यामागे आणखी एक महाकाय डोंगर होता. संधी प्रकाशामुळे पूर्वेला असणार्‍या डोंगररांगा आकाशाचाच भाग झाल्यासारख्या भासत होत्या. खोल समुद्रात जशी आकाशाची व्याप्ती जाणवते तसेच होत होते. पहावे तिकडे महाकाय डोंगर रांगा! असेच चालत जाऊन ह्या डोंगर रांगामध्ये हरवून जावे असे वाटते होते.

मुकाम स्थळी पोचून आवरून होईपर्यंत हॉटेल मधून मागवलेले जेवण ही आले. जेवणानंतर आईसक्रीम ही आणले गेले. गप्पा हास्य विनोदाच्या आवाजात एकाने उभे राहून सगळ्यांना शांत केले आणि सर्वांना प्रश्न केला "आजचा दिवस कोणा कोणाला आवडला?" जवळ जवळ सगळ्यांनीच जल्लोष करत हात उंचावले. सगळ्यांना शांत करून टाळ्या वाजवत तो म्हणाला "मला जरा ही आवडला नाही! आवडण्याचे तर सोडाच मला तर मी इथे आलो त्याचेच वाईट वाटत आहे. का माहीत आहे?" आता काय बाहेर येणार ह्या चिंतेने सगळ्यांच्या चेहार्‍यावर प्रश्न चिन्ह दिसू लागले. त्यानेच मग उत्तर द्यायला सुरवात केली "अभयारण्याला भले संरक्षण संवर्धनाचा संदेश द्यायचा असेल पण आपल्यासारख्यांनी तो घेतला तर ना! आपण आलो बारा तेरा गाड्यांमधून, दोन्ही वेळेला जेवलो थर्माकोल-प्लास्टिक कोटेड थाळ्या आणि प्लास्टिक चमचे वापरून, दिवस्भर पाणी प्यायलो प्लास्टिकच्या छोट्या बाटल्यांमधून, इथे ही परतल्यावर आपल्याला साधा ओला-सुका कचरा ही वेगळा करता येत नाही?" आता सागळ्यांना त्याचा रोख कळला आणि वातावरण आणखी गंभीर झाले. तो पुढे म्हणाला "अभायरण्यात येऊन प्राणी - पक्षी पहाणे तर सोडाच आपण तर दिसणार्‍या झाडा फुलांची दखल ही घेतली नाही. उद्याचाही दिवस फक्त फोटो आणि नावापुरती अभयारण्याची सहल ह्यासाठी ज्यांना घालवायचा असेल त्यांच्या बरोबर मला यायचे नाही. मी उद्या वेगळे फिरयाला जायचे ठरवले आहे आणि माझ्या बरोबर येण्यास इच्छुक असणार्‍यांना आजच्या दिवसात काय खास निसर्ग निरिक्षण केले त्याची माहिती द्यायला लागेल आणि मी जास्तीत जास्त तीनच जणांना माझ्याबरोबर घेऊन जाईन!"

ह्या परिक्षेत पास होऊन माझी जागा राखण्यासाठी माझ्याकडे बर्‍यापैकी माहीती आहे असे वाटून मला एकदम हायसे वाटले!

Wednesday, March 27, 2019

निसर्गप्रेमींना तोड नाही...

गावात आलेल्या अनोळखी गाडीची बातमी अख्या गावाला लगेचच कळावी असे जेमतेम पाचशे घरांचे घाट माथ्यावरचे दुष्काळी गाव. पुढे पठार, कोरड्या दर्‍या आणि ओसाड डोंगरांच्या रांगा. पण ह्या वर्षी पावसाने अचूक वेळ साधत जमिनीत दडून बसलेल्या जंगली झाडांच्या बियांना भोज्जा करून कोंब फुटवले. तो बाण डोंगर उतारावर असा लागला होता की पुढील दोन महिन्यात अख्खा डोंगर उतार इंद्रधनुषी होऊन गेला.  गावाने ही कधी न पाहिलेली रंग बरसात दर्‍यांमधून दिसू लागली. जिल्ह्याच्या वर्तमानपत्रात बातमी ही झळकून गेली. एक दोन दिवस त्याची चर्चा करून गाव परत आपल्या कामात गुंतला.

आज सकाळपासून प्रत्येक गाडीवान मोबाईलवरचा फोटो दाखवत रस्त्याकडेच्या घरातल्या माणसांना दिशा विचारत विचारत दरीकडे गेले. गावकर्‍यांना ही जरा अप्रूप वाटलं. दोन पाच उत्साही मुले गाड्यांना रस्ता दाखवायला सायकल दौडवत गेले. आज अख्या दिवसात पंचवीस तीस गाड्या गावात येऊन गेल्या. पुढे एक दोन दिवस गाड्यांची संख्या वाढत गेली.

शनिवारी सकाळी गाव जागा झाला तो गाड्यांच्या आवाजानेच! दुपार पर्यंत तर गावातल्या प्रत्येक रस्यावर गाड्या उभ्या केलेल्या दिसू लागल्या. तरी ही येणार्‍यांची संख्या कमी होत नव्हती. मारूतीच्या शेपटासारखी गाड्यांची लांबच लांब रांग डोंगरावरून दिसत होती. गावकर्‍यांना घराबाहेर पडणं अवघड झाले. त्यांना तर त्यांचे सर्व व्यवहार ठप्प झाल्यासारखे झाले. एवढी गर्दी हाताळायला गावातील पोलिस ही तयारीचे नव्हते. गावात हॉटेल तर सोडाच चहा-पाण्याची सोय नव्हती.

तिथे पठारावर आणि दरीवर तर क्रिकेट मॅचला गर्दी जमावी तेवढी गर्दी! जिथे जाणं ही अवघड अशा ठिकाणी निसर्गप्रेमी चक्क बसकण मारून घसरत घसरत, असंख्य फुले चिरडत आपल्या फोटोत दुसरा कोणी येऊ नये म्हणून आणखी चांगल्या जागा शोधत होते. गाड्यांच्या टायरखाली पठारावरील किती फुले चिरडली गेली ह्याची तर गणतीच नव्हती.  छान एकांतात फुललेला निसर्ग गर्दी बघून आकसून गेला.

सोमवारी पेपरात आलेला गर्दीचा आकडा बघून गावकरी चक्रावले. लवकरच गावाची एक सभा बोलावली गेली. कारण पुढील काही अठवड्यात काय होईल ह्याची गावकर्‍यांना भितीच वाटू लागली. सभेसाठी पोलिस आणि वन विभागाच्या अधिकार्‍यांना ही बोलावले गेले. गेल्या अठवड्याभरात स्थानिक पोलिसांचा, गावकर्‍यांचा एकंदरीत कसा गोंधळ उडाला हे मांडण्यात आले. सभे नंतर सर्वांनी एक फेरफटका मारून परिस्थितीचा अंदाज घेतला. सभेत ठरवल्याप्रमाणे पोलिस आणि वन विभागाच्या संकेत स्थळावरून, सोशल मिडीयावरून जिल्ह्याच्या वर्तमानपत्रातून पर्यटकांना काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. वेशीवर, पठारावर ही तसे फलक लावण्यात आले. अठवडाभर असलेली ’तुरळक’ गर्दी हाताळत गावचा निसर्ग वाचवण्यासाठी शनिवार रविवारच्या मोठ्या लढाईला गाव तयार झाला.

शनिवार दुपारच्या आतच गर्दी हाताळण्यासाठी केलेली मोर्चे बांधणी पूर्णपणे कोलमडली. मागच्या वेळपेक्षा तिपटीने पर्यटक आले. उभे केलेले काही फलक आता फुलांबरोबर गप्पा मारत होते! वहानांची संख्या इतकी वाढली की हायवेवरून गावाकडे येणारा रस्ता बंद करावा लागला. निसर्गविधीसाठी केलेली सोय ही कोलमडली आणि अचानक एका दूरच्या पठारावर वावटळच उठली. रस्ता बंद करता काय...मग आम्ही हेलिकॉप्टरनेच येतो! गर्दीपासून दूर असलेल्या एक जोडपे खरोखरच हेलिकॉप्टरने उतरले. त्यांच्यावर काय कारवाई करता येईल ह्याचा विचार अधिकारी अजून करत आहेत!

एकंदरीतच सातार्‍याजवळचे कास असू द्या नाही तर कॅलिफोर्नियातील लेक एल्सिनोर - वॉकर कॅनियन..किंवा आणखी कुठले गाव...निसर्गप्रेमींना तोड नाही!

लेक एल्सिनोर - वॉकर कॅनियन बातमीसाठी

Monday, October 8, 2018

छ्या! इतरांच्या चुका आणि मला उगाच...


"ए आई, हे बघ ह्यांचा मेसेज आला आहे की त्या प्रोग्रॅमध्ये मी सिलेक्ट झालो ते! येस! केवढा आनंद झाला आहे मला! आता उद्या माझ्या वर्गातील आणि कोणकोण सिलेक्ट झाले आहे ते पहायचे आहे.
"हो ग! सोमवारी कुठे जायचे आहे त्याचा मिळेल ग पत्ता! त्यांची वेबसाईट आहे सगळे आहे. बघ, माझे कौतुक करायचे सोडून तू काहितरी फालतू प्रश्न मला विचारू नकोस."
"हॅलो, कुठे पार्क केली आहेस? नेहमीच्याच जागी न? मी शाळेच्या गेट बाहेर पडलोय, दोन मिनिटात पोचतो."
"माझ्या वर्गातील फक्त आणखी एकचजण सिलेक्ट झाला आहे! आता तो चालत जात आहे की कसा ते नाहि मी विचारले. तू चल मी GPS लावलं आहे. बारा मिनिटे दाखवत आहे, गाडीने"
"थोडे पुढे दाखवतोय ग! थोडे पुढे घे आणि मग मी उतरतो. अग, जास्त पुढे आलीस ग! आता घे यु टर्न. बस, बस इथेच दाखवतोय. मी जातो आणि फोन करतो मग तू निघ"
"छ्या! इथून ते शिफ्ट झालेत अस म्हणत होती ती काम करणारी माणसं! काहि नको ग त्यांना फोन करायला, त्या माणसांनी साधारण पत्ता सांगितला आहे. ह्यांना साधी वेबसाईट पण अपडेट करता येत नाहि आणि आम्हाला काय गायडन्स देणार? चल तो नविन पत्ता मी लावलाय मी १० मिनिटे दाखवत आहेत. म्हणजे पाचेक मिनिटे लवकरच पोचेन मी. चल तू लवकर निघ"
"थांब इथेच थांब. मी त्या ठिकाणी विचारतो."
"बरे झाले, तिथे त्यांचाच माणूस होता त्याने सांगितले की गाडीने अगदी दोन मिनिटावर आहे. घेतला मी नवा पत्ता. चल"
"छ्या! हा मॅप असा गोल गोल फिरवत आहे? मला वाटते तू पार्क कर आणि चालत जाऊ. ह्या मोठ्या कॉम्प्लेक्समध्येच असणार म्हणून तो आतील रस्ता नीट मॅपवर दाखवत नसेल."
"त्या माणसाने जो पत्ता दिला तोच लावलाय. पण आता चालताना हि आपण उलटे जात आहोत असे दाखवतोय तो मॅपवर! तूच घे आता मॅप नाहितर विचार ना त्या तिकडे एकतर मला आता उशीर झाला आहे"
"नाहि मी जाऊन आलो ह्या बिल्डींगमध्ये दुसर्‍या माळ्यावर तिथे काहि नाहि"
"तो मॅप आता दोन ब्लॉक पुढे दाखवतोय? तुला नक्की वाटतंय का की आपण आता बरोबर दिशेला चाललो आहे मॅपप्रमाणे?"
"हा हे बघ, इथेच आहे! तू जा आता जा मी फोन करेन. दिसताय मुले बसलेली. सुरू हि झालंय!
"छ्या! इतर सगळे वेळेत आलेत. उगाच आईमुळे उशीर झाला! त्या चुकीच्या पत्यावरून इथे फास्ट ड्राईव्ह केले असते तरी मी वेळेत पोचलो असतो. छ्या!

Friday, July 20, 2018

इव्होल्युशन मध्ये आपली ढवळाढवळ?

बोलता बोलता जिममध्ये एक बाई सांगू लागल्या की तिची मांजर दिलेले खाणे खातच नव्हती. जेंव्हा नीट पाहिले तेंव्हा त्यात मुंग्या दिसल्या आणि त्यांना घरात बर्‍याच मुंग्या असल्याचा साक्षात्कार झाला! पुढे त्यांनी हे हि सांगितले मांजराला पूर्ण पाळीव (हाऊस कॅट) बनवण्यासाठी म्हणजे त्याने आपणहून कुठलाहि उंदिर, पक्षी पकडू नये म्हणून त्यांनी काहि उपाय केले आहेत. त्याच्या गळ्यात घंटा बांघली आहे, त्याला एक बिब (लाळेर्‍यासारखे) हि घातले आहे जेणे करून सावज सावध होईल आणि दूर जाईल! त्याचबरोबर त्याला भरपूर खायला देणे आणि त्याच्या बरोबर खेळणे म्हणजे त्याला घराबाहेर जायचे कारणच उरणार नाहि! आता अशा मांजरीने आपल्या पिल्लाला (झाली तर!) तरी काय शिकवावे की असं असं वाग म्हणजे हळूहळू तुझीच "शिकार" होईल?

मग आमच्या योगा शिक्षिका सांगू लागल्या की त्यांच्या मुलाने काहि महिन्यांपूर्वी एक कुत्रा कुठूनतरी सोडवून आणला. काल त्याला फिरायला नेले तर तो असा विचित्र धावल्याने ह्यांच्या हाताभोवती गुंडाळलेला चामड्याचा पट्टा ओढला जाऊन चामडी फाटून पार खोल जखम झाली! त्यांना असे वाटते की त्याला त्याच्या आधीच्या मालकाचे / त्या जागेविषयीचे काहि तरी आठवले असेल म्हणून तो असा धावला. परत असे काहि होऊ नये म्हणून त्यांनी आता त्याला "वन-ऑन-वन" ट्रेनर ठेवून त्याची मानसिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवले आहे!

Tuesday, July 17, 2018

ऐसे (आपल्याकडे) होणे नाही...

वीसेक वर्षांपासून इकडे असणाऱ्या मित्राकडे गप्पात विषय आला तो सिग्नलला मदत मागणाऱ्या इकडच्या बेघरांचा. आपल्याकडे त्याना काही तरी मिळते इकडे गाडी कोण थांबवणार! पण माझ्या मित्राने मला अशी माहिती दिली की बहुतांशी हे लोकं स्वखुशीने बेघर होतात एकंदरीत कार्यपध्दतीचा निषेध म्हणून!
अंधार पडू लागला म्हणून गप्पा आटोपल्या. त्याच्या पोर्चमधून सहज नजर आकाशात गेली आणि पश्चिमेला चंद्र - शुक्राची सुंदर युती त्याला दाखवली. त्याने शुक्र पहिल्यांदाच पहिला आणि म्हणाला "वा, भारतात इतका चांगला शुक्र दिसतच नाही".
ह्या अशा गोष्टींमुळेच कदाचित माझ्या ओळखीच्या मुलीची इच्छा आहे की पुढचा जन्म मिळणारच असेल तर तो अमेरिकेत कुत्र्याचा  मिळावा!
गेल्या दोन वर्षांच्या वास्तव्यात अमेरिकेचे गुणगान तर ऐकत होतोच पण ह्या अशा गोष्टींमुळे तर खात्रीच पटली की इकडे होते ते छानच आणि ऐसे (आपल्याकडे) होणे नाही...

Monday, March 5, 2018

हा माझा मार्ग...

१९९५-२००० - दर शुक्रवार-रविवारी कोणाच्या तरी घरी एकत्र जमून गप्पा - टप्पा - जेवण, जोरजोरात काहि गोष्टी कशा बदलता येतील ह्याच्या चर्चा,  कधी जवळपास फिरायला जाणं! वेळ मजेत जायचा!

२०००-२००५ -  मुलांच्या जन्मानंतरचे, वाढदिवसांचे, बडबडगीतांचे, काहि कारणाने एकत्र जमून पॉटलक केल्याचे अशा घरगुती मोजक्या फोटोंमधून आमच्या ग्रुपची बातमी आता आमच्या पर्यंत पोहचू लागली. आम्हिहि आपूलकीने बघून आनंदालो!

२००५-२०१० - ग्रुपमध्ये नविन चेहरे, नवीन घरांचे, गाड्यांचे, पालकांच्या भेटींचे, बाहेर फिरायला गेल्याचे, बच्चे कंपंनींचे शाळेतील बक्षीसे घेतानाचे, वाढदिवसाच्या सरप्राईज पार्ट्यांचे भरपूर प्रमाणात फोटो - व्हिडिओच्या लिंक्स आम्हाला इमेलने मिळू लागल्या.

२०१०-२०१५ - कुणाच्या तरी सरप्राईजला किंवा एकत्र जमून बॉलिवूड गाण्यांवर पध्दतशीर शिकून केलेल्या नाचांचे, गणपती - दिवाळीच्या बरोबरीनेच नविन वर्षांच्या - व्हॅलेंटाईन डे च्या थीम नुसार ठरवलेल्या ड्रेसमध्ये, पार्टयांसाठी सजवलेल्या घरांमध्ये एकमेकांना जोरजोरात चिअर्स करतानाचे, खाद्य पदार्थांच्या विविधतेचे फोटो - व्हिडिओ आता लगेचच मिळू लागले.

२०१५-२०१८ - आताच्या फोटो व्हिडिओत घरात स्पेशल डान्स फ्लोअर,  डिस्को लाईटींग, डीजे, फॉग मशीन, पायात चपला-बूट घालूनच वावरणारी लोकं, फोटो बूथ, मद्याचा वाहता ओघ, मोठ्यांनाच खेळता येतील असे खेळ आणि ह्या सगळ्या सकट दरवेळी नवनवीन थीम्स दिसू लागल्या! ह्या सगळ्या खेळाचे मोजक्या शब्दात करायचे तर म्हणता येईल ’पेज-थ्री पार्टी’!

थोडा विचार केल्यावर वाटले की मागेच कधीतरी मार्ग बदलले आहेत त्यामुळे हा विषय इथेच थांबवणे योग्य!

Thursday, January 25, 2018

कामाचा स्वेटर

निघालो तर जोरदार थंडी होती. मी लांब बाह्यांच्या टी-शर्टवर स्वेटर, जॅकेट आणि कानटोपी घातली होती. इथे तरी हे कपडे कामाला आले असा विचार करत मी गाडीत बसलो.
गाडी थोडी पुढे आल्यावर गाडीच्या दिव्याच्या उजेडात रंगीबेरंगी स्वेटर घालून पहिल्या बसने ३० किमी लांब असलेल्या हायस्कूल - कॉलेजला जाणारी मुले दिसली. तोंडातून वाफा बाहेर काढत हातावर हात घासत थंडीला पळवायचा प्रयत्न करत होती. मांडीखाली घातलेल्या माझ्या हाताची घडी घातली गेली.
नदीवरच्या पुलाच्या अलिकडे अर्ध्या बाह्यांचे स्वेटर घातलेल्या काहि बाया डोक्यावर आणि काखेत कळशा घेऊन चालताना दिसल्या. गाडीने पूल ओलांडेपर्यंत माझी कानटोपी सीटवर पडली.
हायवेला लागल्यावर आमच्या नेहमीच्या चहाच्या टपरीच्या आधी दगडफोड्याचे एक कुटुंब दगड फोडण्याचे काम करत होते. त्याच्या अंगात साधी बंडी आणि त्याच्या बायकोच्या अंगावर साडी! चहाला खाली उतरण्याआधी माझे जॅकेट सीटवर पडले.
चहावाल्याला भाऊंनी "तीन चहा घे रे आणि दोन चहा पाव त्या दगडफोड्याला देऊन ये" असं सांगत माझ्याकडे बघून हसत म्हणाले "काय, आता तरी थंडीची बोच कमी होईल ना?"

Tuesday, January 23, 2018

नेमेचि येतो मग अनिवासी भारतीय...

दर दोन वर्षांनी भारत यात्रेवर येणार्‍या माझ्या मित्रासमोर बसून माझी श्रवणभक्ती चालू होती. परदेशी नागरिकत्व, भारताचा इ-व्हिसा असल्याने त्याचे विमानतळावरचे काम सुखकर जरी झाले असले तरी त्याच्या मैत्रीचा हात कस्टम्स्‌ अधिकार्‍याने नाकारत सामानावर ड्युटी लावल्याने तो थोडासा दुखावला होता. परदेशातील लाच न घेणे, स्वच्छता, वाहनांचा वेग अशा विषयांवर भरधाव  धावणार्‍या त्याच्या गप्पांच्या गाडीचे चाक लवकरच इकडच्या कधीही न बदलणार्‍या परिस्थितीत, घाणीत आणि चिखलात रुतून नुसतेच गोल गोल फिरू लागले! शेवटी दुसर्‍या दिवशी सकाळी सहा वाजता माझ्याबरोबर फेरफटका मारण्याचे आमंत्रण देऊन रुतलेल्या गाडीतून खाली उतरत मी चालत घरचा रस्ता धरला!
दुसर्‍या दिवशी सकाळी मला अर्धा तास ताटकळत ठेवून परत एकदा इथल्या न बदलणार्‍या परिस्थितीची जणू त्याने जाणीवच करून दिली. घराबाहेर पडताच चिवचिवाटातून ऐकू येणारा तांबट पक्षाचा आवाज त्याला ऐकायला सांगितले. परदेशातील निरव शांततेला सरावल्याने असेल कदाचित पण तांबटाचा आवाज ऐकायला त्याला चक्क मिनिटभर तरी लागलेच! कोकीळच्या सादला मात्र त्याने पटकन दाद दिली. रस्त्याच्या नावात जरी बुलेव्हार्ड नसले तरी दोन्ही बाजूंच्या झाडांच्या कमानीखालून जायला छानच वाटत होते. काही झाडांवर बगळ्यांची घरटी दिसत होती आणि काहि काहि बगळ्यांच्या मानेच्याभोवती आलेला वेगळ्या रंगाचा पिसारा त्यांची विणीच्या हंगामाची तयारी असल्याचे खुणावत होते. चालता चालता बकुळीच्या फुलांच्या सड्यातील थोडी फुले आता आमच्याहि हातात आली आणि जुन्या रस्त्याची नवी ओळख आवडल्याचे मित्राच्या चेहर्‍यावर दिसून आले.
वस्तीच्या बाहेर येऊन खाडीच्या दिशेने चालताना वाटेत सोनकी, तेरडा तर कुठेतरी एखादी लाजाळू हि फुललेली दिसत होती. कांदळवनात निदान तीन चार वेगवेगळ्या प्रजाती दिसल्याच आणि पाण्याबरोबर वाह्त जाऊन रूजणार्‍या शेंगाहि दिसल्या. खाडीच्या जवळ रोहित पक्षांचा गुलाबी रंगांचा मोठा थवा दिसत होता. तुरुतुरु धावणारा चिखल्या बघायला गंमत वाटत होती. पाण्याच्या जरा वर उडत असणार्‍या छोट्या पक्षांच्या थव्याने अचानक दिशा बदलून पंखांखालचा पांढरा रंग चमकवून दाखवला. काहि कारणाने रोहित पक्षांनी हि एकदम उडून जागा बदलली. परतीच्या वाटेवर गरूड हि दर्शन देऊन गेला.
सकाळची सुरवात एवढी चांगली झाल्यावर दिवस मजेत न जावो तरच नवल! वाटेतल्या दूध केंद्र, पेपर स्टॉल सांभाळणार्‍यांना ओळख देत देत मित्राला हि शेवटचा अच्छा करून मी निघालो ते त्याचे पुढच्या दिवशीहि वेळेवर फिरयाला जाऊयाच हे आमंत्रण स्विकारतच! कदाचित इकडे चिखलात गाडी रुतवण्यापेक्षा त्यातून मजेने घसरत घसरतहि जाता येते हे त्याला जाणवले असावे!