Friday, February 19, 2021

आई आणि ...

ती एक छोटीशी चाळ होती. अरुंद जिना चढून वर आल्यावर डाव्या बाजूला सामाईक स्वच्छतागृहे आणि उजव्या बाजूला  घराईतक्या लांबीचा बोळ! बोळ तो ओलांडून आले की उजव्या बाजूला सामाईक गॅलरी आणि त्यात दोन दोन खोल्यांची चार  घरे. खालचा वाहता रास्ता इतका लागून की खालच्या स्टॉपवरची बस निघण्याआधी कंडक्टरने मारलेली बेलही घरात ऐकायला येई! कायम 'आमचे घर' राहिले ते श्रमसाफल्यचे घर!

गॅलरीत उभे राहिल्यावर रस्त्यावरून कोणी ओळखीचे जात असेल तर त्याला हाका मारणे नवीन नव्हते पण त्यादिवशी "ए S तुषार, ए S तुषार!" अशा आईच्या हाका अचानक स्वैपाकघरातून येऊ लागल्या. मी आणि आई दोघेच घरात असताना आई अचानक माझ्या भाच्याला का बोलवत आहे हे मला कळेना. "काय गं, काय झाले"  म्हणत मी आत धावलो, तर स्वैपाकघरात ओट्याच्या उजव्या बाजूला असलेल्या छोट्या खिडकीतून बाहेर बघत आई हाका मारताना दिसली. तिथून तर मागचे छोटे अंगण आणि त्यातले एक भोकराचे झाड सोडल्यास कुठलाच रस्ता दिसत नसे. मग आई हाका का मारत आहे हे पाहायला आईच्या मागे उभा राहून कोणी दिसते का ते पाहू लागलो. आईने हाताने ओढून मला खिडकीजवळ उभे केले आणि बोटाने एक जागा दाखवत, हाका मारणे सुरूच ठेवले! तिथे पाहिल्यावर मला आईच्या हाकेला ओ देणारा दिसला आणि ऐकूही आला. "कोण गं तो?" ह्या प्रश्नाला आईचे उत्तर आले "बुलबुल!" कावळे, चिमण्या, कबुतरानंतर आईने शिकवलेला माझा पहिला पक्षी!

खूप वर्षांनंतर सह्याद्रीच्या कामासाठी कोकणात कुठे गेलो असताना आमच्याबरोबरचे विश्वास जोशी अचानक एका लयीत  "मा S झ्या S बाळाला S टोपी S दे S रे S.. मा S झ्या S बाळाला S टोपी S दे S रे S" असे म्हणू लागले. त्यांनी केलेल्या खुणेच्या दिशेने थोडे शोधल्यावर,  त्यांना त्यांच्या आजीने हे वाक्य गाणारा दाखवलेला दिसला तो शैलकस्तुर!

बुलबुलनंतर आईने माझी ओळख करून दिली ती शीळ घालताना शेपटी उडवत एका जागेवर स्थिर न बसणाऱ्या आणि काळ्या पंखांवर पांढरी पट्टी आणि पांढऱ्या पोटाच्या दयाळ बरोबर!

आत्याकडच्या पहिल्या कोकण ट्रीपमध्ये आईने ओळख करून दिली ती निळसर किंवा मोरपिशी रंगाच्या, लांब जाड पिवळ्या चोचीच्या, तारेवर किंवा झाडावर समाधीस्थ वाटणाऱ्या पण अचानक खालच्या पाण्यात बुडी मारून नेमका मासा पकडणाऱ्या खंडयाबरोबर! तिथेच दाखवली भाताच्या शेतांतून किंवा पाणथळीतून सावकाश सावकाश चालणारी पिवळ्या चोचीची टिटवी!

आईकडे गाणे शिकणाऱ्यांपैकी  तिच्या एवढ्या असणाऱ्यांशी तिची एक खास मैत्री होई. त्यातल्याच एक डॉ. जोबनपुत्रा! त्या कुठल्यातरी एका क्लबच्या मेंबर होत्या आणि अधून मधून पक्षी बघायला ती मंडळी कुठे कुठे जात. त्यांच्याकडे एक दुर्बिणही होती. दोघींच्या गप्पात कधीकधी पक्षीही येत! त्यांच्याकडून पक्षांचे एक पुस्तक आई एकदा वाचायला घेऊन आली होती. पुढे सह्याद्रीत गेल्यावर कळले की डॉक्टरीणबाई बी एन् एच् एस् च्या मेंबर असणार आणि सलीम अलींचे

पुस्तक आईने वाचायला आणले होते! 

पक्षी जसे शिकवले तसे व्यंकटेश माडगूळकर, मारुती चितमपल्ली यांच्या पुस्तकांची ओळखही करून दिली ती आईनेच!

रोहित पक्षी मुंबईला येऊ लागल्याच्या बातम्या वाचल्यावर आईला ते पाहायची इच्छा झाली. मग एकदा आम्ही शिवडीला गेलो पण तेंव्हा काही दिसले नाहीत. एकदा ऐरोली पुलावरही ते थव्याने येत असल्याचे कळले पण आम्ही  गेलो ते फार दुरून दिसले. पण त्यावेळी एक दोन शेकाट्या आणि चिखल्याचे थवे मात्र दिसले. थवा उडताना अचानक दिशा बादलल्यावर त्यांच्या पंखांच्या खालचा राखाडी भाग एकदम चमकून दिसलेला आईला आवडला. 

परवा अचानक स्वैपाकघरातून दिसणाऱ्या झाडावर पंधरा वीस पक्षी दिसले म्हणून लय ओवीला हाक मारली त्यांचे फोटो काढले. आम्ही नंतर शोधले तर ते waxwing आहेत असे कळले. 

नवे चक्र सुरू झाले!

4 comments:

  1. खूप छान ,आईला फुलांची, पानांची , आणि तू वर्णन केलेले पक्षी एकंदरीत निसर्गाच्या सानिध्यात तिला आवडायचे ,

    ReplyDelete
  2. खूप छान वाटलं वाचून काकुची आठवण आली तसेच श्रमसफल्य च आपल जुन घर भोकराच झाड सगळ डोळ्या समोर उभ राहील

    ReplyDelete
  3. खूप छान ,आठवणी गोडच असतात,मी खुप लहान होते,तरी माझ्या आठवणीत काकू गाणं खूप छान गायच्या,

    ReplyDelete
  4. शिरीष ताईंची पक्षांची आवड माहिती नव्हती. तुझ्या पक्षी प्रेमाचं मूळ आत्ता कळलं! शिरीष ताईंनी शिकवलेली त्यांनी स्वतः चाल दिलेली गाणी अजूनही मधून मधून गायला मला आवडतात. पण त्यांच्या फिरत्या गळ्याला ती इतकी छान वाटायची. गाणी ऐकतच राहावं असं वाटायचं. माझ्या आयुष्यात आलेल्या संगीतावर अतोनात प्रेम करणाऱ्या व्यक्तींपैकी शिरीषताई एक होत्या.

    ReplyDelete