Saturday, December 26, 2020

देणाऱ्याने देत...

"नाही मी हे घेऊ शकणार नाही! देणाऱ्याने देत जावे... ह्या माझ्या आवडीच्या कवितेला वेगळा अर्थ देऊन तुम्ही मला कितीही पटवायचा प्रयत्न केलात तरी नाही!" स्वानंद त्याच्या मतावर ठाम होता.
करोना काळात त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकदम घरोबा असणाऱ्या सात-आठ जणांचा ग्रुप ऑनलाईन जमला होता.

"आम्ही तुझी मतं जाणतो, पटत नाहीत तरी तुझ्यापुरती पाळतो, तुला काही देणं बंद केले आहेच पण आता ह्यावरून तुझ्याशी वादही घालत नाही! त्यामुळे तुमचे चालू द्या. मी logout करतो. पुन्हा एकदा तुला शुभेच्छा!" असे म्हणून एकाने मीटिंग सोडली. त्याची री ओढत आणखी दोघे तिघे निघाले.

पण ह्यावेळी ज्यांनी भेटवस्तू पोस्टाने पाठवल्या होत्या त्यांनी आणखी किल्ला लढवायचा असे ठरवले होते.

त्यांनाही स्वानंदची मते माहिती होती. तो ही कोणाला भेटी देत नसे, स्वतःसाठीही काहीही नवीन घेत नसे आणि त्यामागे कांजुषपणा नसून पर्यावरण प्रेम, वस्तूंचा पून:वापर, कमीत कमी गरजा, आहे त्यात भागवणे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे अती प्रचंड वेगाने वाढतच चाललेल्या मटेरियलिस्ट जगाची गती कुठेतरी मंद करण्याची त्याची ही स्वतःची पद्धत!

"भेटवस्तू नाकारून तू आम्हाला दुखवत आहेस त्याचे काहीच कसे वाटत नाही तुला? आणि तसेही घरगुती वापराच्या वस्तू आहेत, महागही नाहीत!" उरलेल्या लढवैयांपैकी एकाने भावनिक शस्त्र उपसले.

अनेक वर्षांच्या विचारांवर आधारित स्वानंदची कृती असल्याने अशा प्रहरांना त्याच्याकडे ढिगाने उत्तरे तयार होती "देणाऱ्याच्या भावना आणि माझ्या? खरेदी करण्याआधी तुम्ही आधी आपल्याच ग्रुपमध्ये ह्याच गोष्टी कोणाकडे जास्तीच्या आहेत का, देऊन टाकायच्या आहेत का असे काही विचारले तरी का?"

"आपण एकमेकांसाठी, सभाठी स्वतःसाठी खूप घेतले, आता द्यायची वेळ आली आहे. माझ्यावर प्रेम आहे ना, मग एक काम करा. त्या  कवितेती शेवटची ओळ; 'घेता घेता एक दिवस ...' हे खऱ्या अर्थाने सार्थ करायचा एक मार्ग मी सांगतो. शालेय वस्तू, वाणसमान वगैरे आवश्यक गरजा सोडल्यास इतर काही स्वतःसाठी किंवा भेट म्हणून विकत घेण्याआधी एकमेकांना विचारून; वस्तू विकत न घेता ती गरज भागवता येते का ते पाहू. नाही भागली तर ती वस्तू विकत घेणे टाळू. निदान वर्षभर तरी टाळू! ह्यात अधिकाधिक मित्र-मैत्रिणी नातेवाईक जोडता आले तर पाहू. जे पैसे वाचतील त्याची नोंद ठेवून; वर्षाअखेर जमलेल्या रकमेइतकीच भर मी घालून आपण एखाद्या संस्थेला देऊ. तुम्ही देणगी देताच पण असे पैसे वाचवून आपण आणखी देऊ शकतो. जिथे गरज आहे तिथे आणखी देण्याचा वसा आपण उचलू. आहे कबूल?"
प्रश्न करून तो थांबला आणि नेमकी ऑनलाईन फ्री मीटिंगची वेळ संपली.

ता. क. अधिक चौकशी केल्यावर असे कळले की स्वानंदने त्याला आलेल्या दोन तीन भेटवस्तू परत देऊन टाकल्या आणि तो अजून मित्रांच्या उत्तराची वाट पहात न थांबता नेहमीप्रमाणे एकला चलो रे करत आहे!

No comments:

Post a Comment