Monday, December 14, 2020

.. की मुझे स्ट्रेस नही था!

एकेकाळी जावयाला राव असे संबोधले जाई. काळ बदलला तसे राव जाऊन भाऊजी आले पण एक वेगळा दबदबा मात्र तसाच राहिला आहे. गुजराती लोकं जावयाच्या नावामागे, अवघे पाऊणशे वयमान असले तरी; कुमार जोडून कायम तरुण ठेवतात आणि चेष्टा मस्करीत ओढून घेतात.
दोन्हीतील फरक हा काही आजचा आपला विषय नाही; विषय आहे माझ्या गुजराती मेव्हण्याचा आणि आमच्या दोघांच्या अनोख्या नात्याचा! माझ्या नावामागे कुमार न लागताच मला पाहिल्या दिवसापासूनच अरे तुरे वर आणले गेले! तसा तीन दिवसांनी मी मोठा बाकी मोठा तोच!
माझ्या मुलीच्या वाढदवसानिमित्त आमचा आणखी एक मित्र, मेव्हणा, त्याची बायको असे सगळे जमलो होतो. काहीतरी बोलणे झाले आणि माझे बालपण किती स्ट्रेस मध्ये गेले आहे आणि माझ्या मेव्हण्याचे आणि माझ्या बायकोचे बालपण किती सुखात गेले आहे असे मी म्हटले.

आमच्या कडे फार उशिरा टीव्ही आला तोपर्यंत मी इतरांकडे जाऊन विचारे की आज टीव्ही लावणार का? आमच्या ठराविक ठिकाणी टिव्ही लागणार नसेल तर आमचा मोर्चा दुसरीकडे वळे! तिथे तर ते लोक खिडकीचा पडदा उघडून ठेवत आणि गटाराच्या कडेला उभे राहून आम्ही टीव्ही बघत असू. एकीकडे डास मारणे तर एकीकडे चौकार षटकार मारल्यावर मित्रांना टाळ्या! आमच्या नेहमीच्या ठिकाणी सिनेमा पाहायला घरात घेतले तरी सिनेमाच्या मधल्या वेळेत मात्र त्यांना जेवायचे असे म्हणून आम्हाला घरी जायला सांगितले जाई! आमच्या मित्राने ही लहानपणी असाच कुठेतरी जाऊन टिव्ही वर सिनेमा पाहिलेला आहे हे माहिती होते म्हणून त्याला माझ्या बाजूने घेण्यासाठी म्हटले की बघ ना, त्या वयात किती ही नाचक्की सोसली आपण, नाही तर किती सुखात गेले ह्यांचे बालपण कारण ह्यांच्या घरी आधीपासून टीव्ही! यांचे  बालपण म्हणजे अगदी अमूल बटर, स्ट्रेस फ्री!
परतून वार येण्याआधी आमचा फोन ही किती उशिरा आला आणि ज्यांच्या कडे फोन येई ते शेजारच्या इमारतीत पाचव्या मजल्यावर रहात. तिथून ते ओरडून आमच्या चाळीतील शेवटच्या घरातील कोणाला तरी निरोप देत मग ते आमच्या कडे येऊन आम्ही धावत फोन घ्यायला जात असू. आणि यांच्याकडे सगळ्यात आधी फोन आला! अशी सगळी राम कहाणी सांगून माझ्या बटर ला आणखी खमंग पणा आणला!

आता मात्र मेव्हण्याने शाब्दिक शस्त्र उगारत म्हटले "एकदा धावलास तर इतका स्ट्रेस होई असे सांगत आहेस पण दिवसातून असे चार चार निरोप देण्यासाठी  की मी स्वतः तिसऱ्या मजल्यावरून खाली वर असे आमच्या आणि बाजूच्या इमारतीत धावत असे.  "और इसे लगता है की मुझे स्ट्रेस नही था" !

माझे बटर त्याच्या आवडीच्या विब्स पावावर लावून तो मजेत खात आहे असे मला वाटले. मी सावरणार तोच त्याने दुसरा वार केलाही! प्रसंग होता त्याच्या आणि त्याच्या बायकोच्या कॉलनीच्या टीमची तिच्या घरासमोर खेळली जाणारी क्रिकेटची मॅच! "आमचा पहिला खेळाडू आऊट झाल्यावर मी खेळायला आलो. इसको भी लगा चलो अपना हीरो आ गया! तशी आमची टीम ठीक होती पण यांची मात्र जोरदार होती. मला बाउंडरी, फील्डर्स दिसण्याआधी समोर बसलेले सासू सासरे दिसत होते! नेमका समोर अती वेगवान गोलंदाज! पण त्या दिवशी माझ्या इभ्रतीचा प्रश्न होता. मी स्टांस घेतला, तो धावत जवळ आला आणि एकदम थांबला असे वाटले. त्याच क्षणी एक जोरदार कळ येऊन मी अचानक ताठ झालो आणि आपसूकपणे हात मागे गेला. माझ्या पार्श्वभागावर काहीतरी जोरात आपटले असे वाटले. गोलंदाजाला चेंडू परत दिला तेंव्हा मला कळले की जे आपटले तो बॉल होता!" जमलेले सगळे हसले म्हणून त्याने लगेच म्हणून टाकले "और इसे लगता है की मुझे स्ट्रेस नही था! मी परत स्टांस घेतला. तो धावत आला, त्याने बॉल टाकला माझे पूर्ण लक्ष बॉलकडे होते, मी पाय पुढे टाकून एक छानपैकी लॉफ्टेड ड्राइव मारला आणि शॉटच्या दिशेने पाहू लागलो. प्रेक्षकांतून  जोरात  आवाज आला आणि दुसऱ्या टीमचा जल्लोष पाहून मी गोंधळात मागे पाहिले तर माझी मधली यष्टी चांगली वीस फूट दूर जाऊन पडली होती! सांसाऱ्याच्या चेहऱ्यावर लल्लू, बॅट नही संभाल  सकता मेरी लडकी को क्या संभालेगा असा भाव होता! विचार कर माझे काय झाले असेल! और इसे लगता है की ... !" हे होतेच!

खरे तर बॉल लागून त्याचा पार्श्वभाग शेकला गेला होता, तो शून्यात आऊट झाला होता हे सगळे असतानाही इथे  यशश्री त्याच्या गळ्यात आणि मी माझ्याच होम ग्राउंडवर पराभवाची धूळ चाखत होतो! पण एवढ्यात मी हार मानायला तयार नव्हतो!

आमचाही प्रेम विवाह! त्याने त्याच्या लग्नाच्या आधीची गोष्ट सांगितल्याने मी ही माझ्या लग्नाच्या आधी हिने माझी फजिती कशी केली होती ते सांगितले. पण माझा प्रसंग इतका बसका निघाला की माझ्याच बटरवरून मीच घसरून भुईसपाट झालो होतो. आमच्या मित्राने ही आता त्याची बाजू घ्यायला सुरवात केली होती!

तरी लगेच "ते जाऊ दे तुला त्या गोलंदाजाने एकदा धुतला, मला आमच्या घरी, शेजारी जाता येता धूत!" "शेजारी तर होतेच पण एकदा मी माझ्या मोठ्या बहिणीला त्रास देत होतो तर तिने आमच्या कामवाली बाईला सांगितले आणि कपडे धुताना ती तशीच बाहेर आली मला बाथरूममध्ये घेऊन गेली आणि दोन्ही गालावर दहा बारा थपडा लगावल्या आणि उचलून परत बाहेर ठेवून दिले! मार बऱ्याच जणांनी खालेला असतो पण असा बाईच्या हातचा मार? मला नाही वाटत!" मला माहिती होते की माझ्या  सासू सासऱ्यांनी ह्या दोघांना कधी ही मारलेले नाही आणि त्याच्या बायकोला ही लहानपणी धाक होता ते, म्हणून तिला टाळी देऊन मी तिला माझ्या बाजूचे करून घेतले. तिने ही "हो हे मात्र खरे की ह्यांचे बालपण ह्या बाबतीत तरी अगदी चौकोनी होते!" माझा किल्ला मी जोरात लढवला ह्यात शंका नव्हती!

"अरे तुला त्या बाईने हाताने घरात एकदा मारले म्हणजे जिवावर काही बेतले नव्हते तुझ्या" असे म्हणत तो वार करण्यास सरसावला! "मी आणि माझी बहीण भाड्याने सायकल घेऊन फिरवत फिरवत चुकून आमच्या जवळच्या अशा वस्तीत गेलो की तिथे सगळेच भाई! प्रत्येकाचे फोटो पोलिस स्टेशनवर लागलेले! तिथे एक एवढासा पोरगा आमच्या जवळ आला, अचानक सायकल थांबवली आणि सरळ चाकू दाखवून पैसे मागू लागला! खिशात सायकलच्या भाड्याचे पन्नास पैसे होते ते त्याला दिले आणि धूम ठोकली दोघांनी! चाकू! विचार कर भाजीचा चाकू सोडून दूसरा कुठलाही चाकू पाहिलास तरी होतास का तेंव्हा? अरे घरी येऊन पैसे घेऊन सायकल परत करेपर्यंत उशीर झाल्याने आणखी वीस पैसे दंडही लागला होता तेंव्हा" 

मी ही माझ्या पतंगाला ढील दिली! "एकदा बाजूच्या गच्चीवर पतंग उडवत असताना काटाकाटीत कोणीतरी रस्त्यावरून उडवणाऱ्या मुलांचा पतंग कापला. आम्ही सगळे जल्लोषात! तेवढ्यात गच्चीत अचानक भीमा प्रगट झाला! भीमा, असेल आमच्यापेक्षा पाच सहा वर्षेच मोठा पण तो होता बाजूच्या वस्तीतील दादा! त्याला बघताच आपापले पतंग टाकून कोणी पटकन जिन्याने सटकले तर कोणी पाण्याच्या टाकीखाली लपले. असा आरडा ओरडा केला त्याने की सगळे जमले म्हणून आम्ही सुटलो!" अर्थात भीमाने चाकू वगैरे काढला नसल्याने माझ्या मांजात तितकी धार नव्हती!

माझ्या बाजूने असणारी त्याची बायको आता हळूच त्याला सामील होत म्हणाली "अरे, तुझे ते प्रिंटिंग प्रेसवाल्याचे सांग ना!" आणि तो ही सुटला! "इंजिनियरिंग नंतर बिझनेस करायचा म्हणून आम्ही ठरवून व्हिजिटिंग  कार्डस् करायला दिली. दोन तीन दिवसांनी गेलो तर माझ्या निळ्या रंगाऐवजी त्याने कुठला तरी हिरवा आणि अगदी घाणेरडा रंग, फॉन्ट वापरला होता. माझी मूळ प्रत त्याला दाखवत परत सगळी कार्ड छापून द्यायला त्याला सांगितले. आतून एक दूसरा माणूस आला ती कार्ड हातात घेतली आणि विचारले काय झाले ते. माझे परत सगळे सांगून झाल्यावर अचानक मी जो हेलपांडलो आणि आपसूकपणे गालावर हात चोळत सावरायचा प्रयत्न केला. काय झाले ते कळलेच नाही! दुसऱ्यांदा त्याने नुसती हूल दिली म्हणून मी वाचलो तरी! चूपचाप पैसे देऊन मी घरी परतलो. हिच्याकडे रडलो आणि एक अगदी लोकल जिम जॉइन केला. दुसऱ्या दिवशी व्यायाम करत असताना अचानक राडा झालाय, राडा झालाय असे सांगत काही मुले जमली सगळ्यांच्या हातात जाड जाड चेन होत्या, एकाने माझ्याही हातात चेन दिली आणि ठरले की तिथल्या सगळ्यांनी लगेच निघायचे आणि काम निपटायचेच आज. कसले काम, काय काम काही अंदाज येईना. परवाचा दुखरा गाल आठवला आणि जेमतेम पळ काढला तिथून! और इसे लगता है की ... !" हे होतेच!

"अरे मुलीच्या जन्मा नंतर मी गाडी पार्क केली होती अगदी तुझ्या इमारती जवळ" असे म्हणत मी माझी गाडी दामटली! "परत येऊन पहातो तर पानवाल्याने त्याच्या दुकानासमोर मी गाडी लावली म्हणून चाकातील  हवा काढली होती. भांडणे झाली. तुझे मित्र ही तिथेच माझी चेष्टा बघत उभे होते. मग सगळे लटांबर पोलिस स्टेशनला. ते सगळे दुकानदार आणि मी साधा माणूस! इन्स्पेक्टर ने लगेच ओळखले कोण स्थानिक कोण नाही. एक जोरदार शिवी हासडून, हात उगारला, भरपूर बोलला आणि माझी चूक नसतानाही मला वाट्याला लावले." माझ्या कानाखाली वगैरे बसली नसल्याने माझ्या गाडीच्या चाकासारखी माझ्या प्रसंगाची हवा निघून गेली होती. 

मी काही बोलणार तोच पहिल्यांदा गाडी चालवण्याचा प्रसंग त्याने सुरू केला! गावाला कोणाच्या तरी लग्नानंतर घरातील बायकांना हॉलवरून परत घरी घेऊन जायचे होते. त्याच्या काकाने ह्याला विचारले की तू गाडी चालवतोस ना तर ह्यांना घेऊन जा! "बाइक चालवत होतो पण त्या आधी मी फक्त एकदा गाडी चालवली होती. सगळे गाडीत बसले, मी एकदम शान मध्ये! गप्पा मारत मारत गाडी चालवत होतो. तेवढ्यात मागून एका काकीने आवाज दिला अरे समोर बघ समोर बघ, बोलता बोलता मी दुसऱ्या लेन मध्ये गेल्याने अचानक समोरून येणाऱ्या बाइक वाल्याला रस्त्यावरून खाली उतरावे लागले होते! मी परत गाडी ह्या साईडला आणली. मग काही झाले नाही. सुखरूप घरी पोचलो. लोकं बसली होती. गप्पा चालू होत्या तेवढ्यात एक शर्टाला माती वगैरे लागलेला माणूस घरात आला आणि थेट मला हेरून माझी कॉलर पकडली आणि सणसणीत कानाखाली लागावली! सगळे मध्ये पडले माफी मागितली आणि माझी सुटका झाली! काकाने नंतर मला सांगितले की तो एक स्थानिक राजकीय नेता आहे, एका लाफेत निभावले आणि तू जिवंत आहेस ह्याचे मला आश्चर्य आहे!"

मी सावरायच्या आतच पुढचा प्रहार झाला! "हनिमूनला चेन्नईला गेलो होतो. एक तर भाषा येत नाही आपल्याला आणि ते हिंदी बोलत नाहीत. अशात एका रिक्षावाल्याने तासभर फिरवून अंधारात हॉटेलजवळ रिक्शा उभी केली. आतून एका बाजेवर बसलेले अत्यंत तर्र झालेले चार जण आले, पांढरी लुंगी वर करत घोगऱ्या आवाजात काय म्हणून विचारले. तिथून जावे म्हटले तरी वस्ती पासून खूप दूर होतो म्हणून खोली हवी असे सांगितले. त्यांनी तिरस्काराने पहात वर यायला सांगितले. रात्रभर तिथे खोलीत जे मिळेल ते दारवाज्यामागे लावून जागून काढली. और इसे लगता है की ... !" हे होतेच!

मग तो अमेरिकेत असेच कुठे फिरायला गेला असताना हॉटेल मध्ये त्यांचा नंबर आधी असून ही एका वेगळ्या ग्रुपचा  आधी नंबर लावला म्हणून काउंटरवर विचारले तर थातुर मातुर उत्तर देऊन वाटेला लावले. वैतागून निघत असतानाच त्या ग्रुप मधील एका माणसाने येऊन त्याला बाहेर बोलावले आणि मागील बाजूला नेऊन भिंतीवर दाबून चक्क चाकू बाहेर काढला की आम्ही स्थानिक आहोत तू बाहेरून आला आहेस जास्त आवाज करू नकोस! 

सगळे हसत होतेच! सारी दुनिया एक तरफ औरजोरू का भाई एक तरफ असे मी ही म्हणतो पण फरक इतकाच आहे की मी मध्ये बसून दोन्हीकडचे फटके खात आहे असे मला वाटू लागले.

ते झाल्यावर अमेरिकेतच एका माणसाने भिती वाटे पर्यंत मागे लागून कसे हैराण केले ते झाले, तिथल्याच जिममधील एका माणसाने कसा दम भरला ते झाले. मला वर्तुळाचे केंद्र व्हायला अगदी आवडते आणि हवे असते पण इथे मी तर चक्री वादळाचे केंद्र बिंदू बनलो होतो; म्हणजे बाकी सगळे पोट धरून हसत होते आणि मी तितकाच शांत शांत पडत होतो!

अनेकदा त्याच्या गालावर थप्पड बसली होती, त्याला दम दिला गेला होता पण इथे प्रत्येक प्रसंगाच्या शेवटी समेवर आल्यासारखे "और इसे लगता है की मुझे स्ट्रेस नही है" असे म्हणत माझ्या पाठीवर थाप मारत पाठ लाल करत होताच पण माझा चेहेराही पडत होता!

एकत्र जमणे कायमचे लक्षात ठेवण्यासाठी जास्तीत जास्त हास्याची कारंजे उडली पाहिजेत खरी पण इथे तर त्या कारंज्याखाली बिरबलाच्या गोष्टीतील माकडीणीच्या पिल्लाप्रमाणे माझी गत झाली होती! माझी हार स्पष्ट होती!

तरीही आम्ही परत एकत्र येऊ वेगळ्या विषयावर परत असेच घडेल आणि परत एकदा मी नामोहरम होईन! ही साखळी कधीही तुटणार नाही ह्यातच माझ्या पराभवाचा आनंद आणि आमच्या नात्याचे गुपित दडले आहे!

त्याला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा!

No comments:

Post a Comment