Tuesday, January 14, 2020

न दिसणारे...

माझ्या चुलत भावाला त्याच्या पहिलीतल्या मुलीची सध्या खूप काळजी वाटत आहे. तशी ती मुलगी आनंदी, चुणचुणीत आहे पण मध्येच कधीतरी वेगळ्याच विश्वात गेल्यासारखी वावरते, न दिसणार्‍या लोकांशी, वस्तूंशी गप्पा मारत बसते, ते ही कित्येक वेळ! तिला हलवून परत आणावे लागते इतकी ती तिच्या विश्वात रमते!

शाळेतून ही तक्रारी आल्या. डॉक्टरांनी मानोसपचार तज्ञांकडे घेऊन जायला सुचवले आणि माझा चुलत भाऊ व्याकूळ झाला.

डॉक्टरांकडून घरी परत येताना त्याला देऊळ दिसले म्हणून तो आत गेला! त्याने मागितले काही नाही पण मन शांत करून आला....न दिसणार्‍या देवापाशी!

Friday, January 10, 2020

नक्की ओळख पटेल...

माझ्या एका बहिणीने कर्नाटकातील एका जंगलातून फिरून आल्यावर मला छान वर्णन लिहून कळवले. पण एकही पक्षी ओळखता न आल्याबद्दल तिला वाईट वाटत होते. म्हणून तिला मी हे उत्तर दिले...


तो आवाज, ते रूप, ती लकब दाखवून तो गेला
मीच बसले शोधत त्याचे नाव गाव पत्ता!
मग कळले, नाव सांगायला तो आलाच नव्हता
जे द्यायचे होते ते देऊन तो गेला!

पण आलाच जर परत तर नक्की ओळखेन,

मी त्याला आणि तो मला!