९ महिन्यांची होत असलेल्या नातीसाठी काय खेळणी घ्यावीत याची शोधाशोध करताना माझ्याकडे खेळण्यांचा हा एवढा मोठा ढीग जमा झाला!
१. चावीची खेळणी (wind up toys) - वेगवेगळी पक्षी, प्राणी, गाड्या चावी दिली की मागे-समोर-बाजूला जाणारी तर काही कोलांटया उड्या मारणारी! पण मला या खेळण्यांच्या बगलेतून बाहेर आलेली छोटी चावी आणि बाळाचे तोंड हे काही डोक्यातून जाईना! यातली काही पाण्यात तरंगणारी आहेत त्यांच्या पाठीवर गोलात बरोबर बसवलेली चावी असलेली आवडली कारण चावी अशी असल्याने तोंडात जाऊच शकणार नाही! त्यातलीच काही कापडाची (चावी आणि जमिनीवर टेकलेला चालणारा भाग सोडल्यास वरील भाग कापडाचा), अंधारात चमकाणारी, दिवे असणारी, आवाज करणारी असे ही प्रकार आहेत. हे सर्व प्रकार खालील खेळण्यांत ही उपलब्ध आहेत म्हणून प्रत्येकात वेगळे नमूद केलेले नाही.
२. रांगणारी खेळणी (crawling toys) - यात कासवे, गोगलगाई असे सरपटणारे प्राणी आधिक! वरचे सगळे प्रकार यात आहेत. यात जरा मोठे लोडाच्या आकाराचे हवेने भरलेले आणि आत वेगवेगळे आवाज करणारे खुळखुळेही आहेत जेणेकरून बाळाने त्याच्या नादाने रांगावे!
३. मागे खेचून सोडता येणारी खेळणी (Pull back) - याला वेगळी चावी नसल्याने ही आवडली!
४. दोरीने ओढयची खेळणी (pull along toys) - ही जरा रांगणाऱ्या, बसणाऱ्या, चालायला शिकणाऱ्या बाळांसाठी छान आहेत. यात लाकडी खेळणी विशेष आकर्षक आहेत.
५. घसरगुंडीवरून धावणारी खेळणी (roller coaster toys) - साध्या ते अगदी खऱ्याखुऱ्या रोलर कोस्टर प्रमाणे असणाऱ्या घासारगुंड्यावरून गाड्या, चेंडू सोडून दिले की हा टोल्याचा आवाज, गाडीचा हॉर्न, दिवा लावून, मध्येच हवेत झेप घेत खाली सरकन येणारी गमतीशीर खेळणी!
६. चेंडू (ball) - इतक्या प्रकारचे चेंडू असतील असे वाटले नव्हते! यात ही रांगायला मदत होतील असे आहेतच! वरून काटेरी पण सहज दाबता येतील असेही आहेत.
८. वाद्ये (musical instruments) - ढोल, खंजिरी, पिपाणी, त्रिकोण, खुळखुळे, झायलोफोन आणि इतर काही वाद्ये एका पोतडीत मिळतात. इतकी की बाळ नक्की आवाज करून घर डोक्यावर घेऊ शकेल! जरा अतिशयोक्ति! पण त्यातील काही लाकडाची बनवलेली अत्यंत सुबक दिसणारी आणि तितकाच छान आवाज असणारी ही आहेत! त्यात जरा मोठ्या मुलांसाठी किंवा त्यांच्या पालकांना सहज वाजवाता येईल असा दहा भोकांचा बाजा (हार्मोनिका) आणि अंगठ्याने वाजवता येईल असा पियानो (thumb piano) ही चांगला वाटला. यातच पाश्चिमात्य संगित लिपीतील स्वर ज्या पद्धतीने दर्शवतात त्या आकाराचे एक वेगळे असे जपानी ऑटोमॅटोन ही दिसले. त्याच्या खालच्या फुग्याला दाबून त्याच्या दांडीवर कुठेही बोटाने दाब दिला की व्हायोलिनला जवळ जाणारा पण त्याहून अधिक म्युट आवाज येतो. सरावाने गाणे नक्कीच वाजवता येईल पण तोपर्यंत जरा तो तितकासा मधूर वाटणार नाही.
९. रांगणे, बसणे, चालणे याच्या सरावासाठी - पडले तरी लागणार नाही अशा सॉफ्ट मॅटवर ठेवता येतील अशा आकर्षक रंगातील छोट्या (सात ते आठ इंच ऊंची पर्यंत जातील) सॉफ्ट पायऱ्या, घसरगुंड्या ही छान आहेत. जागाही खूप खात नाहित आणि वेलक्रोने एकमेकांना जोडून हवा तसा चढ उतार बनवता येतो. पण ही सगळी बऱ्यापैकी महाग आहेत. त्यापेक्षा घरीच उशा, लोड वापरुन करता येईल असे वाटू लागले.
१०. बाहुल्या - असंख्य!
११. कपडे - असंख्य!
१२. पुस्तके - असंख्य! पाण्यात घेऊन जाता येतील अशी ही! आणि गाणारी ही! कमाल म्हणजे quantum physics, Newtonian physics पासून Blockchain for babies असल्या विषयांवरही पुस्तके आहेत! पण तसले विषय जरा अतिच!
१३. वैज्ञानिक खेळणी (scientific toys) - मला वाटलं होतं की एवढ्या लहान मुलांसाठी वैज्ञानिक खेळणी कशी असतील पण भरपूर प्रमाणात वैज्ञानिक खेळणी उपलब्ध आहेत.
शेवटी मी काय घेणार याचे उत्तर अजून मिळालेले नाही! आणि त्यातच आत्ताच आलेल्या बातमीनुसार इतर सर्व लहान मुलांप्रमाणे माझी नात ही वर्तमानपत्र हातात घेऊन त्याच्या आवाजावर हसते. थोडी मोठी झाली की खेळण्यांपेक्षा त्यांच्या रिकाम्या बोक्सेस बरोबर नक्की खेळेल! त्यामुळे सुज्ञास सांगणे ..!