चाळीतील पंचेचाळीस - पन्नासच्या आसपास असणाऱ्या आमच्या पालकांच्या ताज्या-टवटवीत जुडीत, आम्ही पाल्य म्हणजे मरगळलेले गवत! त्यामानाने लहान वयात पालक होऊनही आमची जुडी मात्र शिळीच, पण पाल्य मात्र गवताचे भाले ठरले! असो, आत्ताचे पुराण मरगळलेल्या गवताचे!
विश्वास असण्या-नसण्याचा आणि प्रसाद मिळण्याचा संबंध जसा देवाबाबत नसतो तसाच आमच्या चमूच्याबाबतही नव्हता. कधी आमच्या आत्मविश्वासाला "फाजिल" हे बिरूद लावून तर कधी एखाद्या कृत्यामागे आम्हीच असल्याचा ठाम विश्वास पालकांना वाटून शाब्दिक प्रसाद मिळे. वरून प्रसाद द्यायला त्या मुलाचे पालकच हवेत असाही नियम नव्हता, जो कोणी मोठा त्यावेळी उपस्थित असेल तो प्रसाद वाटप करू शेक! फक्त गणपतीत काय तो घरोघरी जाऊन प्रसाद घेण्याचे काम आमचेआम्ही आनंदाने करत असू.
एकदा चाळीत आम्ही, "अफजलखानाचा वध" करायचे ठरवले. पण शिवाजीने एकट्याने वध करण्याच्या प्रसंगात सगळ्यांना युद्धाचा जोश दाखवायला मिळत नव्हता म्हणून त्यात थोडी फेरफार केली. तुळजा भवानीची विटंबना केल्यावर "तिथल्याच" जावळी खोऱ्यात गाठून घनघोर युद्ध करून खानाला संपविण्याचा विडा आम्ही उचलला. जावळी खोरे हे फार रोमांचकारी शब्द वाटल्याने असेल कदाचित ते मात्र आम्हाला हवे होते! एका मित्राच्या घरात तालीम करत असताना खानाने आवेशात येऊन धुण्याची काठी उलट सुलट फिरवताना तिथला देव्हाराच खाली पाडला! एकच रणधुमाळी माजली. गनिम आणि मावळ्यांत संगनमत झाले आणि खरी हत्यारे उपसली गेली. त्याच आवेशात हातोडी आणि दगडाचा जोरदार प्रसाद खिळ्यांना देऊनही देव काही त्यांच्यावर विश्वास ठेवेनात! हे प्रकरण हाताबाहेर जात आहे असे लक्षात येऊ लागल्यावर एकेकजण गनिमी काव्याने निसटू लागला. तरी आम्ही तीन चार जणं किल्ला लढवत होतो आणि तेवढ्यात खरा गनिम समोर उभा ठाकला. हे प्रकरण देवाचे असल्याने शाब्दिक प्रसादाच्या नक्कीच पलीकडे असल्याचा विश्वास आम्हाला होता. पण झाले भलतेच!
काकूंनी एकदम बसकण मारली आणि त्या रडायला लागल्या. कोणीच काही बोलेना. हातानेच त्यांनी आम्हाला निघून जायला सांगितले. ही बातमी वणाव्यासारखी बातमी पसरली. त्यांचे सांत्वन करायला इतर काकू आल्या, तरी त्या मानेनात. तोपर्यंत आम्ही कुठेतरी दबा धरून बसलो होतो. संध्याकाळी एकेकाचे बाबा येऊ लागले तसे प्रसाद खाण्याची वेळ येऊन ठेपल्याची जाणीव झाली. आज महाप्रसाद खाण्याची आम्ही तयारी ठेवली. पण त्याहीपेक्षा भयानक प्रसाद मोठ्यांनी आम्हाला दिला;
पुढचे काही दिवस सगळ्यांनीच आमच्याशी मौन युध्द पुकारले. शाळेतून सरळ घरी येणे, खेळणे बंद करणे, अभ्यास करणे, न सांगता घरातील कामे करणे असे तहाचे आमचे सगळे प्रयत्न फसू लागले. काही दुसऱ्या पध्दतीने वाटाघाटी करण्याची गरज भासू लागली. नंतर अचानक त्या काकूंनी सोळा सोमवार करायचे ठरवल्याची बातमी हेराने आणली. मग दर सोमवारी आम्ही त्यांना बेलाची पाने वगैरे देत होतो. असे करता करता उद्यापनाच्या गोष्टी बोलल्या जाऊ लागल्या. सगळी मोठी मंडळी तयारीसाठी भेटू लागली. सगळ्या चाळीचा तो प्रसंग होता. उद्यापनाच्या दिवशी तर चाळीतील प्रत्येक घरात पंगत आणि सगळ्यात पुढे मदतीला या सगळ्या गोष्टीचे कर्ते करविते आम्ही मावळे!
पहा, आम्हीच मूळ कृत्य केले होते यावर सगळ्यांचा विश्वास तर होताच आणि भरभक्कम पुरावा ही त्यावेळी समोर होता तरी आम्हाला मिळाले ते उद्यापानाच्या प्रसादाचे गोड जेवण!
म्हणून म्हटले की विश्वास असण्या-नसण्याचा आणि प्रसाद ...
छान!!
ReplyDelete"कार्य फळाला आले " !
ReplyDeleteअप्रतिम लिहिले आहे .
उत्तम वाचनानुभव. Ab Dil mange more
ReplyDeleteलहानपणच्या खोड्या आठवून आता हसू येते.पण तेव्हा कसा समरप्रसंग उभा राहिला असेल हेही अगदी डोळ्यासमोर उभे राहते.
ReplyDelete