Monday, March 5, 2018

हा माझा मार्ग...

१९९५-२००० - दर शुक्रवार-रविवारी कोणाच्या तरी घरी एकत्र जमून गप्पा - टप्पा - जेवण, जोरजोरात काहि गोष्टी कशा बदलता येतील ह्याच्या चर्चा,  कधी जवळपास फिरायला जाणं! वेळ मजेत जायचा!

२०००-२००५ -  मुलांच्या जन्मानंतरचे, वाढदिवसांचे, बडबडगीतांचे, काहि कारणाने एकत्र जमून पॉटलक केल्याचे अशा घरगुती मोजक्या फोटोंमधून आमच्या ग्रुपची बातमी आता आमच्या पर्यंत पोहचू लागली. आम्हिहि आपूलकीने बघून आनंदालो!

२००५-२०१० - ग्रुपमध्ये नविन चेहरे, नवीन घरांचे, गाड्यांचे, पालकांच्या भेटींचे, बाहेर फिरायला गेल्याचे, बच्चे कंपंनींचे शाळेतील बक्षीसे घेतानाचे, वाढदिवसाच्या सरप्राईज पार्ट्यांचे भरपूर प्रमाणात फोटो - व्हिडिओच्या लिंक्स आम्हाला इमेलने मिळू लागल्या.

२०१०-२०१५ - कुणाच्या तरी सरप्राईजला किंवा एकत्र जमून बॉलिवूड गाण्यांवर पध्दतशीर शिकून केलेल्या नाचांचे, गणपती - दिवाळीच्या बरोबरीनेच नविन वर्षांच्या - व्हॅलेंटाईन डे च्या थीम नुसार ठरवलेल्या ड्रेसमध्ये, पार्टयांसाठी सजवलेल्या घरांमध्ये एकमेकांना जोरजोरात चिअर्स करतानाचे, खाद्य पदार्थांच्या विविधतेचे फोटो - व्हिडिओ आता लगेचच मिळू लागले.

२०१५-२०१८ - आताच्या फोटो व्हिडिओत घरात स्पेशल डान्स फ्लोअर,  डिस्को लाईटींग, डीजे, फॉग मशीन, पायात चपला-बूट घालूनच वावरणारी लोकं, फोटो बूथ, मद्याचा वाहता ओघ, मोठ्यांनाच खेळता येतील असे खेळ आणि ह्या सगळ्या सकट दरवेळी नवनवीन थीम्स दिसू लागल्या! ह्या सगळ्या खेळाचे मोजक्या शब्दात करायचे तर म्हणता येईल ’पेज-थ्री पार्टी’!

थोडा विचार केल्यावर वाटले की मागेच कधीतरी मार्ग बदलले आहेत त्यामुळे हा विषय इथेच थांबवणे योग्य!

Thursday, January 25, 2018

कामाचा स्वेटर

निघालो तर जोरदार थंडी होती. मी लांब बाह्यांच्या टी-शर्टवर स्वेटर, जॅकेट आणि कानटोपी घातली होती. इथे तरी हे कपडे कामाला आले असा विचार करत मी गाडीत बसलो.
गाडी थोडी पुढे आल्यावर गाडीच्या दिव्याच्या उजेडात रंगीबेरंगी स्वेटर घालून पहिल्या बसने ३० किमी लांब असलेल्या हायस्कूल - कॉलेजला जाणारी मुले दिसली. तोंडातून वाफा बाहेर काढत हातावर हात घासत थंडीला पळवायचा प्रयत्न करत होती. मांडीखाली घातलेल्या माझ्या हाताची घडी घातली गेली.
नदीवरच्या पुलाच्या अलिकडे अर्ध्या बाह्यांचे स्वेटर घातलेल्या काहि बाया डोक्यावर आणि काखेत कळशा घेऊन चालताना दिसल्या. गाडीने पूल ओलांडेपर्यंत माझी कानटोपी सीटवर पडली.
हायवेला लागल्यावर आमच्या नेहमीच्या चहाच्या टपरीच्या आधी दगडफोड्याचे एक कुटुंब दगड फोडण्याचे काम करत होते. त्याच्या अंगात साधी बंडी आणि त्याच्या बायकोच्या अंगावर साडी! चहाला खाली उतरण्याआधी माझे जॅकेट सीटवर पडले.
चहावाल्याला भाऊंनी "तीन चहा घे रे आणि दोन चहा पाव त्या दगडफोड्याला देऊन ये" असं सांगत माझ्याकडे बघून हसत म्हणाले "काय, आता तरी थंडीची बोच कमी होईल ना?"

Tuesday, January 23, 2018

नेमेचि येतो मग अनिवासी भारतीय...

दर दोन वर्षांनी भारत यात्रेवर येणार्‍या माझ्या मित्रासमोर बसून माझी श्रवणभक्ती चालू होती. परदेशी नागरिकत्व, भारताचा इ-व्हिसा असल्याने त्याचे विमानतळावरचे काम सुखकर जरी झाले असले तरी त्याच्या मैत्रीचा हात कस्टम्स्‌ अधिकार्‍याने नाकारत सामानावर ड्युटी लावल्याने तो थोडासा दुखावला होता. परदेशातील लाच न घेणे, स्वच्छता, वाहनांचा वेग अशा विषयांवर भरधाव  धावणार्‍या त्याच्या गप्पांच्या गाडीचे चाक लवकरच इकडच्या कधीही न बदलणार्‍या परिस्थितीत, घाणीत आणि चिखलात रुतून नुसतेच गोल गोल फिरू लागले! शेवटी दुसर्‍या दिवशी सकाळी सहा वाजता माझ्याबरोबर फेरफटका मारण्याचे आमंत्रण देऊन रुतलेल्या गाडीतून खाली उतरत मी चालत घरचा रस्ता धरला!
दुसर्‍या दिवशी सकाळी मला अर्धा तास ताटकळत ठेवून परत एकदा इथल्या न बदलणार्‍या परिस्थितीची जणू त्याने जाणीवच करून दिली. घराबाहेर पडताच चिवचिवाटातून ऐकू येणारा तांबट पक्षाचा आवाज त्याला ऐकायला सांगितले. परदेशातील निरव शांततेला सरावल्याने असेल कदाचित पण तांबटाचा आवाज ऐकायला त्याला चक्क मिनिटभर तरी लागलेच! कोकीळच्या सादला मात्र त्याने पटकन दाद दिली. रस्त्याच्या नावात जरी बुलेव्हार्ड नसले तरी दोन्ही बाजूंच्या झाडांच्या कमानीखालून जायला छानच वाटत होते. काही झाडांवर बगळ्यांची घरटी दिसत होती आणि काहि काहि बगळ्यांच्या मानेच्याभोवती आलेला वेगळ्या रंगाचा पिसारा त्यांची विणीच्या हंगामाची तयारी असल्याचे खुणावत होते. चालता चालता बकुळीच्या फुलांच्या सड्यातील थोडी फुले आता आमच्याहि हातात आली आणि जुन्या रस्त्याची नवी ओळख आवडल्याचे मित्राच्या चेहर्‍यावर दिसून आले.
वस्तीच्या बाहेर येऊन खाडीच्या दिशेने चालताना वाटेत सोनकी, तेरडा तर कुठेतरी एखादी लाजाळू हि फुललेली दिसत होती. कांदळवनात निदान तीन चार वेगवेगळ्या प्रजाती दिसल्याच आणि पाण्याबरोबर वाह्त जाऊन रूजणार्‍या शेंगाहि दिसल्या. खाडीच्या जवळ रोहित पक्षांचा गुलाबी रंगांचा मोठा थवा दिसत होता. तुरुतुरु धावणारा चिखल्या बघायला गंमत वाटत होती. पाण्याच्या जरा वर उडत असणार्‍या छोट्या पक्षांच्या थव्याने अचानक दिशा बदलून पंखांखालचा पांढरा रंग चमकवून दाखवला. काहि कारणाने रोहित पक्षांनी हि एकदम उडून जागा बदलली. परतीच्या वाटेवर गरूड हि दर्शन देऊन गेला.
सकाळची सुरवात एवढी चांगली झाल्यावर दिवस मजेत न जावो तरच नवल! वाटेतल्या दूध केंद्र, पेपर स्टॉल सांभाळणार्‍यांना ओळख देत देत मित्राला हि शेवटचा अच्छा करून मी निघालो ते त्याचे पुढच्या दिवशीहि वेळेवर फिरयाला जाऊयाच हे आमंत्रण स्विकारतच! कदाचित इकडे चिखलात गाडी रुतवण्यापेक्षा त्यातून मजेने घसरत घसरतहि जाता येते हे त्याला जाणवले असावे!

Monday, January 22, 2018

द्राविडी प्राणायाम

ब्राम्ह मूहूर्तावर निघायचे ठरवले होते कारण ’लांबचा पल्ला...काय होईल... कस्स होईल...’! त्यात आधीच मित्रांनी रस्त्याची केलेली रंजक वर्णनं आणि शंका! सरळ जाणार रस्ता बंद नसता तर प्रवासाचे अंतर अवघ्या ४० मिनीटात पार करता आले असते त्याला आता चांगलाच वेळ लागणार होता. आधी उत्तरेला १०० किमी मग पूर्वेला १६० किमी, दक्षीणेला ८० किमी आणि आणि शेवटच्या टप्प्यात पश्चिमेला ६० किमी असा प्रवास होता. काहि सामान त्याच दिवशी पोचवायचे असल्याने हा सगळा हा द्राविडी प्राणायाम! माझ्या उत्सुकतेला बरीच कारणे होती; उत्तर - दक्षीण पसरलेल्या लांबलचक नॅशनल फॉरेस्टची एक छोटी प्रदक्षिणा, त्यासाठीचे वाहन कारण जातानाचा प्रवास होता चक्क ट्रकमधून आणि येताना ट्रेन!
जरी थोडा उशीर झाला असला तरी हवेतील थंडावा जाणवत होता! अर्ध्या तासाच्या आतच वाहन अगदी सराईतपणे चालवलं जात आहे असं वाटल्याने नव्या वाहनाची,  वळणदार रस्त्याची काळजी जाऊन हळूहळू सभोवतालाची जाणीव होऊ लागली. डाव्या बाजूला अगदी शांत वाटणार्‍या समुद्रावर मच्छीमारांच्या होडक्यांचे दिवे मात्र हेलकावे खाताना दिसत होते. रस्त्याच्या दुसर्‍याकडेला थोडी थोडी शेतं हि असल्यासारखी वाटत होती. खुरट्या झाडीतून एखादा काजवाहि चमकत होता. मध्येच कधीतर डोंगर रांगांच्या घळीतून समुद्राच्या दिशेने जाणार्‍या वार्‍याचा भसकन हल्ला झाला की मात्र वाहनावरचा सराईतपणा गळून पडल्यासारखा वाटे! एक छोटा बोगदा पार केल्यानंतर मात्र वार्‍याचे छुपे हल्ले बंद झाले.
आता आमाचा समुद्राकडे पाठकरून सूर्याच्या दिशेने प्रवास चालू झाला होतो. नॅशनल फॉरेस्टच्या मधून जाणारा हा रस्ता एक पदरीच होता. थोड्याच वेळात लहान लहान आकाराची टेकाडं दिसू लागली होती. समुद्राच्या वाळूतले छोटे छोटे किल्लेच! महाकाय कासवांच्या पाठीसारखे त्यांचे आकार होते. जवळ असूनसुध्दा टेकाडांचा माथा आणि पायथा एकाच नजरेत समावत होता तर त्यांच्या मागच्या डोंगरांची उंची इतकी की ढगांनी झाकल्यामुळे त्यांचा माथाहि दिसत नव्हता. काहि काहि टेकाडांच्या पश्चिमेचा भाग माथ्यावरच्या एकाच झाडाच्या सावलीत झाकला जात होता. तिथेच थांबून दोन चार टेकाडांना सहज प्रदक्षिणा घालून चढून जावं अस वाटू लागलं. दूर कुठे कुठे घिरट्या घालणारे शिकारी पक्षी आणि रस्त्याच्या कडेला गाडीची ठोकर लागून मरून पडलेला एखादा कोल्हा एवढीच काय ती नॅशनल फॉरेस्टची निशाणी!
दक्षिणेकडचा बराचसा प्रवास घाटमाथ्यावरूनच झाला. खोल दरीत मोठी मोठी तळी आणि त्यांचे बांधारे दिसत होते. ह्या तळ्यांमुळेच झालेल्या नदीने मग आम्हाला आमच्या पश्चिमेकडील प्रवासात साथ दिली ती अगदी आमच्या गावापर्यंत. आम्हि गावात शिरताना शेवटचे एक दर्शन देऊन ती गेली समुद्राकडे!
परतीला रात्रीची गाडी पकडून आम्हि परत आमच्या ठिकाणी पोचलो आणि वाटलं की खरोखरीच एक मोठा प्रवास संपला!
प्रवासाचा शीण झटकून सकाळी उठून सगळं उरकेपर्यंत बातमी आली कि रस्ता दुपारी एक वाजता सुरू होणार आहे! मित्रांना काय, उलट-सुलट केलेल्या प्रवासाच्या कौतुकाचे रुपांतर ह्या बातमीने लगेच चेष्टेत झालं!

Sunday, December 17, 2017

उर्जा तर असतेच पण...

किनाऱ्यालगतही छोटी मासळी बरीच मिळते.
कोणी छोट्या होडक्यातून एकट्या एकट्याने अशी मासळी पकडतात पण त्याला वैयक्तिक मर्यादा पडतात.

कोणी पैसे असतील तर ट्रॉलर घेतात आणि यांत्रिक पद्धतीने आत आत जाऊन मासळी पकडतात.

पण ह्या दोन्हीच्या मधला मार्ग म्हणजे सहकारी तत्वावर चालवलेली रापण. आजूबाजूचे मच्छीमार एकत्र येऊन एक जरा मोठी होडी मोठं जाळं घेऊन 500-700 मिटर आत जाऊन किनाऱ्याला समांतर जाळं टाकून दोन्ही बाजूने ओढत जाळं किनाऱ्यावर आणतात. मासळी बरी मिळते, विकता येते, निसर्ग नियम ही पाळता येतात! रापणसाठी एकत्र येणं हे महत्त्वाचे.
एकत्र येणं हा विचार! एकत्र येऊन ती ऊर्जा कशी वापरावी हे त्या त्या समविचारी गटाने ठरवावे!

Tuesday, November 28, 2017

प्रसन्न दिवस

सकाळी डोळे उघडले आणि परत एकदा पोटात खड्डा पडला.
दूध घ्यायला जाताना मी जरा वळसा घालून जातो. कारण मागच्यावेळी वाटेतल्या दुधवाल्याने एक रुपया जास्तच घेणार असे झोपेतीलइतर गिर्हाइकांसमोर ठणकावत मला दुखावले होते.
परत येताना मी सकाळी फिरणे चांगलेह्या सबबीखाली आणखी दुरुन येतो. ह्याला कारण वाटेतील मंदिर. मंदिरात जाणारा मीदोन वेळा स्वखर्चाने गळका नळ बदलून दिल्यावर तिसर्यांदा तरी मंदिर ट्रस्टने ते काम करावे अशा अपेक्षेने मंदिरात गेल्यावर ट्रस्टीने वसकन ओरडून भक्तांसमोर माझ्या विचारावरची त्यांची भक्ती दाखवून दिली होती.
मंदिराला बगल देऊन जवळच्या गल्लीऐवजी पुढची गल्ली मी घेतो कारण तिथे माझ्या इमारतीच्या अगदी बाजूच्या इमारतीचे गेट येत नाहि. त्या इमारतीत दररोज वरच्या टाकीतून पाणी का गळते हे विचारल्यावर तिथल्या सेक्रेटरी आणि त्यांच्यामुळे वॉचमनने माझ्या बिग थिंकिंगवर पाणी ओतून झाडले होते.
मी अशी भटकंती करून वाटेत कुठेहि वेगळी विघ्ने दिसोत असा विचार करत अर्ध्या तासाने  घरी येतो आणि कामावर जायची तयारी करतो.
सर्वांनाच वाटते की आपल्याला हिरवा सिग्नल मिळावा पण माझे कारण वेगळेच असते. लाल सिग्नल दिसला तर आपसूक माझा हात लॉककडे जातो आणि काचाहि वर होतात! ब्रेकवरच्या थरथरत्या पायाला, माझ्या गाडीचे दार उघडून लाल सिग्नलला थांबल्याबद्दल शिव्या घालणारा माणूस आठवत असावा.
लंच टाईममधे मी इतरांसोबत फिरायला जायला टाळतो कारण छोटे-मोठे काहि विकत घेऊन पैसे दिल्यावर सुट्या पैशाच्या रुपात मला चॉकलेट् घ्यायची नसतात.
ऑफिसमधील कुणीहि सोबत नसतानाच मी पेट्रोल भरायला जातो कारण क्रेडिट कार्डावर पैसे देताना पुढील एक रुपयावर राऊंडिंग करण्यावरून माझे हसे उडालेले असते.
संध्याकाळी जिन्याजवळचे सोसायटी ऑफिस उघडे असेल तर कधी एकदा लिफ्ट येते असे मला होते. कारण ओला - सुका कचरा वर्गिकरणकमीत कमी पाणी वापरदेखाव्यांपेक्षा गळतीला महत्व अशा अनेक कारणांवरून मला उधळले गेलेले असते.
टीव्ही वरची डिबेट्स बघत जेवून मी झोपायला जातो. उद्या तरी सकाळी ह्यासगळ्याकडे संपूर्ण कानाडोळा किंवा तडीस नेणार्‍या  डोंबिवली फास्टच्या निगरगट्टपणाने मला जाग यावी असा विचार करत मी झोपी जातो.

Friday, November 22, 2013

नक्की बदल होत आहे...

काल कोन्हवली गावात, चिपळूणपासून २.५ तासावर, शैक्षणिक केंद्र संमेलनात म्हणजे शिक्षकांच्या शाळेत गेलो होतो ! एका केंद्रात साधारण १२-१५ शाळा असतात. सर्व केंद्रांनी महिन्यातून एकदा असे संमेलन भरवून त्याचा अहवाल सादर करणे अपेक्षीत आहे. सर्व शिक्षकांनी एकत्र येऊन चर्चा करणे, शैक्षणिक समस्या सोडवणे, विचारांची देव-घेव असे स्वरूप असते.
देव्हारे केंद्रातर्फे आयोजित केलेल्या कालच्या सत्रात ४० शिक्षक होते. प्रार्थनेनंतर (होय, शिक्षकांचीही प्रार्थना!), पर्यावरण संतुलन ह्या विषयासाठी सह्याद्रीला बोलावले होते. त्यानंतर पुस्तक परिचय, नविन उपक्रम असे काही आणखीही कार्यक्रम होते. प्रत्येक कार्यक्रमानंतर थोडे खेळ! कोन्हवलीच्या शिक्षकांनी भरवलेल्या छोट्या प्रदर्शनात एका शिक्षकांनी एक कॅलेंडर कापून शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील काही महत्वाचे टप्पे स्वतःच्या टीपणीसकट छान दाखवले होते. तसेच छोटे छोटे घनाकृती खोके वापरून गणित शिकवण्याच्या सोप्या पद्धतीही दाखवल्या होत्या. काही शिक्षकांनी रांगोळ्याही काढल्या होत्या. इंग्रजी शिकवण्याच्याही काही सोप्या पध्दती काही शिक्षकांनी दाखवल्या होत्या.
सुंदर परिसर, सर्वांचा सहभाग, अगदी घरगुती वातावरणामुळे कार्यक्रम छानच झाला. कोन्हवलीच्या शिक्षकांनी जेवायला तर चक्क मसाले भात, पुरी, कुर्मा, जिलबीची सोय स्वत:च केली होती. सगळ्यात मुख्य म्हणजे, विद्दार्थ्यांकडे ताटे मांडणे, वाढणे आणि चक्क ताटे घासण्याचीही जबाबदारी दिली होती.
नक्की बदल हो आहे...