१९७५ - ८० - तसा काही मी खूप खाणारा होतो लहानपणी असे नाही पण आई जर तव्यावरची गरम गरम पोळी करत असली तर एक दोन पोळ्या नक्कीच जास्त जात! शुक्रवार संध्याकाळ आईच्या गाण्याच्या रियाजाची वेळ असे. क्लासहून घरी यायला आईला साडेआठ तरी होत. रियाजानंतर सहाजिकच आईला ही भूक लागलेली असे. मग काही तयार नसेल तर पटकन आईच खिचडी लावे. का माहिती नाही, पण मला खिचडी त्यावेळी अजिबात आवडत नसे. पोळी नाही म्हणून माझी थोडी रडरडही असे. अशावेळी आई म्हणे ती घडयाळं, पेनंं असल्या गोष्टींची जोडतोड करत असतोस ना त्यातून पोळीचे यंत्र बनवण्याची काही युक्ति शोधून काढता आली तर पहा. इकडून पीठ आणि पाणी घातले की पोळी तयार होऊन बाहेर आली पाहिजे. सगळ्याजणी तुला धन्यवाद देतील.
२०१८ - अमेरिकेतील माझ्या मित्राने सिंगापूरमध्ये बनलेले पोळी बनवण्याचे असेच यंत्र खरोखरीचे आणल्याचे कळले आणि आईची आठवण झाली. पण तीन चार महीने वापरुन, जाडजाड पोळ्या होतात म्हणून त्याने विकून टाकले असे ही पुढे कळले. म्हणजे मला अजून संधी आहे आईसारख्या पोळ्या बनवणारे यंत्र बनवण्याची!
१९७५-८0 - "दरवेळी तबलजी मिळणे अवघड जाते कधी तरी क्लासवर येत जा की विद्यार्थ्यांबरोबर तबला वाजवायला" आई सांगत राहिली पण मी काही नियमितपणे ते काम केले नाही. तसे आईच्या ओळखीच्यातील कोणी मधून मधून येत असत पण दरवेळी त्यांच्या वेळा जमतच असे नाही. असे झाले की आईचे नेहमीचे वाक्य असे "तबल्याचे मशीन आले पाहिजे रे!" त्यावेळी आमच्या ओळखीच्या एकाने स्वतः सिंथेसायझर बनवायला सुरू केले होते. तो बऱ्याचदा आईला त्याच्या घर वजा प्रयोगशाळेत बोलावे कधी ट्यूनिंगबद्दल विचारायाला, कधी त्याला काही पुढे जमले तर ते दाखवायला आणि दरवेळी आई मला बरोबर घेई. आईही अगदी रस घेऊन सगळे करे.
१९८५ - २०१९ - साधारण ८४-८५ ला आईने त्यावेळी अगदी नवीन नवीन आलेला असा इलेक्ट्रॉनिक तबला घेतलाही! पण आता ही तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की २०१९ साली हाताने वाजवता येईल असा इलेक्ट्रॉनिक तबला इंग्लंडमध्ये निघाला आहे.
१९९६ - १९९७ - आई बाबा अमेरिकेत आले होते. सोबत बरीच पुस्तके घेऊन आले होते. आम्ही कामावर गेलो की घरी वाचनात त्यांचा वेळ जाई. एका संध्याकाळी आईने एका पुस्तकातील काही उतारे मला वाचून दाखवले. नव उद्योजकांना मार्गदर्शन करणारे ते पुस्तक एका मोठ्या कंपनीच्या पर्सोनेल विभागात काम करून नंतर त्याविषयीच स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीने लिहिले होते. भेटलेल्या प्रत्येक माणसाचे नाव, पत्ता, कामाचे स्वरूप, कुठल्या कारणांसाठी भेट झाली, त्यातून इतर किती जणांची नावे कळली, त्यांची काही माहिती असेल तर असे सगळे ते आपल्या वहीत चार्ट काढून नोंदवत. ह्या सगळ्या नोंदिंचा त्यांना पुढे कसा उपयोग झाला ह्याचीही माहिती पुस्तकात दिली होती. "कम्प्युटर इंजिनियर आहेस तू तर अशा कामात नाही का रे मदत होणार?" आईच्या प्रश्नाला मी तशा इलेक्ट्रॉनिक डायरी वगैरे आहेत असे उत्तर दिले पण ते तेवढेच.
२००३ - २००४ - अचानक "माझे नेटवर्क जॉइन कर" असे जुन्या जुन्या मित्रांचे ईमेल येऊ लागले. आता हे नवीन काय पहातो तर linkedin - कामासाठी भेटलेल्या व्यक्तींचे माहिती जाल!
फक्त लहानपणीच आई मला शिकवू पहात होती असे नाही...
छान लिहिलं आहेस.
ReplyDeleteअजूनही लिही,त्यात आईच्या आवर्जून सांगीतिक आठवणी लिही.
ते काम अजिता माई अधिक चांगले करतील.
Delete