Tuesday, July 27, 2021
Backpacking / Packaged Tour
Sunday, July 4, 2021
Unmasking...
Friday, May 7, 2021
विश्वासाच्या प्रसादाचे पुराण..
चाळीतील पंचेचाळीस - पन्नासच्या आसपास असणाऱ्या आमच्या पालकांच्या ताज्या-टवटवीत जुडीत, आम्ही पाल्य म्हणजे मरगळलेले गवत! त्यामानाने लहान वयात पालक होऊनही आमची जुडी मात्र शिळीच, पण पाल्य मात्र गवताचे भाले ठरले! असो, आत्ताचे पुराण मरगळलेल्या गवताचे!
विश्वास असण्या-नसण्याचा आणि प्रसाद मिळण्याचा संबंध जसा देवाबाबत नसतो तसाच आमच्या चमूच्याबाबतही नव्हता. कधी आमच्या आत्मविश्वासाला "फाजिल" हे बिरूद लावून तर कधी एखाद्या कृत्यामागे आम्हीच असल्याचा ठाम विश्वास पालकांना वाटून शाब्दिक प्रसाद मिळे. वरून प्रसाद द्यायला त्या मुलाचे पालकच हवेत असाही नियम नव्हता, जो कोणी मोठा त्यावेळी उपस्थित असेल तो प्रसाद वाटप करू शेक! फक्त गणपतीत काय तो घरोघरी जाऊन प्रसाद घेण्याचे काम आमचेआम्ही आनंदाने करत असू.
एकदा चाळीत आम्ही, "अफजलखानाचा वध" करायचे ठरवले. पण शिवाजीने एकट्याने वध करण्याच्या प्रसंगात सगळ्यांना युद्धाचा जोश दाखवायला मिळत नव्हता म्हणून त्यात थोडी फेरफार केली. तुळजा भवानीची विटंबना केल्यावर "तिथल्याच" जावळी खोऱ्यात गाठून घनघोर युद्ध करून खानाला संपविण्याचा विडा आम्ही उचलला. जावळी खोरे हे फार रोमांचकारी शब्द वाटल्याने असेल कदाचित ते मात्र आम्हाला हवे होते! एका मित्राच्या घरात तालीम करत असताना खानाने आवेशात येऊन धुण्याची काठी उलट सुलट फिरवताना तिथला देव्हाराच खाली पाडला! एकच रणधुमाळी माजली. गनिम आणि मावळ्यांत संगनमत झाले आणि खरी हत्यारे उपसली गेली. त्याच आवेशात हातोडी आणि दगडाचा जोरदार प्रसाद खिळ्यांना देऊनही देव काही त्यांच्यावर विश्वास ठेवेनात! हे प्रकरण हाताबाहेर जात आहे असे लक्षात येऊ लागल्यावर एकेकजण गनिमी काव्याने निसटू लागला. तरी आम्ही तीन चार जणं किल्ला लढवत होतो आणि तेवढ्यात खरा गनिम समोर उभा ठाकला. हे प्रकरण देवाचे असल्याने शाब्दिक प्रसादाच्या नक्कीच पलीकडे असल्याचा विश्वास आम्हाला होता. पण झाले भलतेच!
काकूंनी एकदम बसकण मारली आणि त्या रडायला लागल्या. कोणीच काही बोलेना. हातानेच त्यांनी आम्हाला निघून जायला सांगितले. ही बातमी वणाव्यासारखी बातमी पसरली. त्यांचे सांत्वन करायला इतर काकू आल्या, तरी त्या मानेनात. तोपर्यंत आम्ही कुठेतरी दबा धरून बसलो होतो. संध्याकाळी एकेकाचे बाबा येऊ लागले तसे प्रसाद खाण्याची वेळ येऊन ठेपल्याची जाणीव झाली. आज महाप्रसाद खाण्याची आम्ही तयारी ठेवली. पण त्याहीपेक्षा भयानक प्रसाद मोठ्यांनी आम्हाला दिला;
पुढचे काही दिवस सगळ्यांनीच आमच्याशी मौन युध्द पुकारले. शाळेतून सरळ घरी येणे, खेळणे बंद करणे, अभ्यास करणे, न सांगता घरातील कामे करणे असे तहाचे आमचे सगळे प्रयत्न फसू लागले. काही दुसऱ्या पध्दतीने वाटाघाटी करण्याची गरज भासू लागली. नंतर अचानक त्या काकूंनी सोळा सोमवार करायचे ठरवल्याची बातमी हेराने आणली. मग दर सोमवारी आम्ही त्यांना बेलाची पाने वगैरे देत होतो. असे करता करता उद्यापनाच्या गोष्टी बोलल्या जाऊ लागल्या. सगळी मोठी मंडळी तयारीसाठी भेटू लागली. सगळ्या चाळीचा तो प्रसंग होता. उद्यापनाच्या दिवशी तर चाळीतील प्रत्येक घरात पंगत आणि सगळ्यात पुढे मदतीला या सगळ्या गोष्टीचे कर्ते करविते आम्ही मावळे!
पहा, आम्हीच मूळ कृत्य केले होते यावर सगळ्यांचा विश्वास तर होताच आणि भरभक्कम पुरावा ही त्यावेळी समोर होता तरी आम्हाला मिळाले ते उद्यापानाच्या प्रसादाचे गोड जेवण!
म्हणून म्हटले की विश्वास असण्या-नसण्याचा आणि प्रसाद ...
Saturday, April 10, 2021
आई आणि .. (भाग २)
१९७५ - ८० - तसा काही मी खूप खाणारा होतो लहानपणी असे नाही पण आई जर तव्यावरची गरम गरम पोळी करत असली तर एक दोन पोळ्या नक्कीच जास्त जात! शुक्रवार संध्याकाळ आईच्या गाण्याच्या रियाजाची वेळ असे. क्लासहून घरी यायला आईला साडेआठ तरी होत. रियाजानंतर सहाजिकच आईला ही भूक लागलेली असे. मग काही तयार नसेल तर पटकन आईच खिचडी लावे. का माहिती नाही, पण मला खिचडी त्यावेळी अजिबात आवडत नसे. पोळी नाही म्हणून माझी थोडी रडरडही असे. अशावेळी आई म्हणे ती घडयाळं, पेनंं असल्या गोष्टींची जोडतोड करत असतोस ना त्यातून पोळीचे यंत्र बनवण्याची काही युक्ति शोधून काढता आली तर पहा. इकडून पीठ आणि पाणी घातले की पोळी तयार होऊन बाहेर आली पाहिजे. सगळ्याजणी तुला धन्यवाद देतील.
२०१८ - अमेरिकेतील माझ्या मित्राने सिंगापूरमध्ये बनलेले पोळी बनवण्याचे असेच यंत्र खरोखरीचे आणल्याचे कळले आणि आईची आठवण झाली. पण तीन चार महीने वापरुन, जाडजाड पोळ्या होतात म्हणून त्याने विकून टाकले असे ही पुढे कळले. म्हणजे मला अजून संधी आहे आईसारख्या पोळ्या बनवणारे यंत्र बनवण्याची!
१९७५-८0 - "दरवेळी तबलजी मिळणे अवघड जाते कधी तरी क्लासवर येत जा की विद्यार्थ्यांबरोबर तबला वाजवायला" आई सांगत राहिली पण मी काही नियमितपणे ते काम केले नाही. तसे आईच्या ओळखीच्यातील कोणी मधून मधून येत असत पण दरवेळी त्यांच्या वेळा जमतच असे नाही. असे झाले की आईचे नेहमीचे वाक्य असे "तबल्याचे मशीन आले पाहिजे रे!" त्यावेळी आमच्या ओळखीच्या एकाने स्वतः सिंथेसायझर बनवायला सुरू केले होते. तो बऱ्याचदा आईला त्याच्या घर वजा प्रयोगशाळेत बोलावे कधी ट्यूनिंगबद्दल विचारायाला, कधी त्याला काही पुढे जमले तर ते दाखवायला आणि दरवेळी आई मला बरोबर घेई. आईही अगदी रस घेऊन सगळे करे.
१९८५ - २०१९ - साधारण ८४-८५ ला आईने त्यावेळी अगदी नवीन नवीन आलेला असा इलेक्ट्रॉनिक तबला घेतलाही! पण आता ही तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की २०१९ साली हाताने वाजवता येईल असा इलेक्ट्रॉनिक तबला इंग्लंडमध्ये निघाला आहे.
१९९६ - १९९७ - आई बाबा अमेरिकेत आले होते. सोबत बरीच पुस्तके घेऊन आले होते. आम्ही कामावर गेलो की घरी वाचनात त्यांचा वेळ जाई. एका संध्याकाळी आईने एका पुस्तकातील काही उतारे मला वाचून दाखवले. नव उद्योजकांना मार्गदर्शन करणारे ते पुस्तक एका मोठ्या कंपनीच्या पर्सोनेल विभागात काम करून नंतर त्याविषयीच स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीने लिहिले होते. भेटलेल्या प्रत्येक माणसाचे नाव, पत्ता, कामाचे स्वरूप, कुठल्या कारणांसाठी भेट झाली, त्यातून इतर किती जणांची नावे कळली, त्यांची काही माहिती असेल तर असे सगळे ते आपल्या वहीत चार्ट काढून नोंदवत. ह्या सगळ्या नोंदिंचा त्यांना पुढे कसा उपयोग झाला ह्याचीही माहिती पुस्तकात दिली होती. "कम्प्युटर इंजिनियर आहेस तू तर अशा कामात नाही का रे मदत होणार?" आईच्या प्रश्नाला मी तशा इलेक्ट्रॉनिक डायरी वगैरे आहेत असे उत्तर दिले पण ते तेवढेच.
२००३ - २००४ - अचानक "माझे नेटवर्क जॉइन कर" असे जुन्या जुन्या मित्रांचे ईमेल येऊ लागले. आता हे नवीन काय पहातो तर linkedin - कामासाठी भेटलेल्या व्यक्तींचे माहिती जाल!
फक्त लहानपणीच आई मला शिकवू पहात होती असे नाही...
Friday, February 19, 2021
आई आणि ...
ती एक छोटीशी चाळ होती. अरुंद जिना चढून वर आल्यावर डाव्या बाजूला सामाईक स्वच्छतागृहे आणि उजव्या बाजूला घराईतक्या लांबीचा बोळ! बोळ तो ओलांडून आले की उजव्या बाजूला सामाईक गॅलरी आणि त्यात दोन दोन खोल्यांची चार घरे. खालचा वाहता रास्ता इतका लागून की खालच्या स्टॉपवरची बस निघण्याआधी कंडक्टरने मारलेली बेलही घरात ऐकायला येई! कायम 'आमचे घर' राहिले ते श्रमसाफल्यचे घर!
गॅलरीत उभे राहिल्यावर रस्त्यावरून कोणी ओळखीचे जात असेल तर त्याला हाका मारणे नवीन नव्हते पण त्यादिवशी "ए S तुषार, ए S तुषार!" अशा आईच्या हाका अचानक स्वैपाकघरातून येऊ लागल्या. मी आणि आई दोघेच घरात असताना आई अचानक माझ्या भाच्याला का बोलवत आहे हे मला कळेना. "काय गं, काय झाले" म्हणत मी आत धावलो, तर स्वैपाकघरात ओट्याच्या उजव्या बाजूला असलेल्या छोट्या खिडकीतून बाहेर बघत आई हाका मारताना दिसली. तिथून तर मागचे छोटे अंगण आणि त्यातले एक भोकराचे झाड सोडल्यास कुठलाच रस्ता दिसत नसे. मग आई हाका का मारत आहे हे पाहायला आईच्या मागे उभा राहून कोणी दिसते का ते पाहू लागलो. आईने हाताने ओढून मला खिडकीजवळ उभे केले आणि बोटाने एक जागा दाखवत, हाका मारणे सुरूच ठेवले! तिथे पाहिल्यावर मला आईच्या हाकेला ओ देणारा दिसला आणि ऐकूही आला. "कोण गं तो?" ह्या प्रश्नाला आईचे उत्तर आले "बुलबुल!" कावळे, चिमण्या, कबुतरानंतर आईने शिकवलेला माझा पहिला पक्षी!
खूप वर्षांनंतर सह्याद्रीच्या कामासाठी कोकणात कुठे गेलो असताना आमच्याबरोबरचे विश्वास जोशी अचानक एका लयीत "मा S झ्या S बाळाला S टोपी S दे S रे S.. मा S झ्या S बाळाला S टोपी S दे S रे S" असे म्हणू लागले. त्यांनी केलेल्या खुणेच्या दिशेने थोडे शोधल्यावर, त्यांना त्यांच्या आजीने हे वाक्य गाणारा दाखवलेला दिसला तो शैलकस्तुर!
बुलबुलनंतर आईने माझी ओळख करून दिली ती शीळ घालताना शेपटी उडवत एका जागेवर स्थिर न बसणाऱ्या आणि काळ्या पंखांवर पांढरी पट्टी आणि पांढऱ्या पोटाच्या दयाळ बरोबर!
आत्याकडच्या पहिल्या कोकण ट्रीपमध्ये आईने ओळख करून दिली ती निळसर किंवा मोरपिशी रंगाच्या, लांब जाड पिवळ्या चोचीच्या, तारेवर किंवा झाडावर समाधीस्थ वाटणाऱ्या पण अचानक खालच्या पाण्यात बुडी मारून नेमका मासा पकडणाऱ्या खंडयाबरोबर! तिथेच दाखवली भाताच्या शेतांतून किंवा पाणथळीतून सावकाश सावकाश चालणारी पिवळ्या चोचीची टिटवी!
आईकडे गाणे शिकणाऱ्यांपैकी तिच्या एवढ्या असणाऱ्यांशी तिची एक खास मैत्री होई. त्यातल्याच एक डॉ. जोबनपुत्रा! त्या कुठल्यातरी एका क्लबच्या मेंबर होत्या आणि अधून मधून पक्षी बघायला ती मंडळी कुठे कुठे जात. त्यांच्याकडे एक दुर्बिणही होती. दोघींच्या गप्पात कधीकधी पक्षीही येत! त्यांच्याकडून पक्षांचे एक पुस्तक आई एकदा वाचायला घेऊन आली होती. पुढे सह्याद्रीत गेल्यावर कळले की डॉक्टरीणबाई बी एन् एच् एस् च्या मेंबर असणार आणि सलीम अलींचे
पुस्तक आईने वाचायला आणले होते!
पक्षी जसे शिकवले तसे व्यंकटेश माडगूळकर, मारुती चितमपल्ली यांच्या पुस्तकांची ओळखही करून दिली ती आईनेच!
रोहित पक्षी मुंबईला येऊ लागल्याच्या बातम्या वाचल्यावर आईला ते पाहायची इच्छा झाली. मग एकदा आम्ही शिवडीला गेलो पण तेंव्हा काही दिसले नाहीत. एकदा ऐरोली पुलावरही ते थव्याने येत असल्याचे कळले पण आम्ही गेलो ते फार दुरून दिसले. पण त्यावेळी एक दोन शेकाट्या आणि चिखल्याचे थवे मात्र दिसले. थवा उडताना अचानक दिशा बादलल्यावर त्यांच्या पंखांच्या खालचा राखाडी भाग एकदम चमकून दिसलेला आईला आवडला.
परवा अचानक स्वैपाकघरातून दिसणाऱ्या झाडावर पंधरा वीस पक्षी दिसले म्हणून लय ओवीला हाक मारली त्यांचे फोटो काढले. आम्ही नंतर शोधले तर ते waxwing आहेत असे कळले.
नवे चक्र सुरू झाले!