Monday, July 22, 2019

माझी परिक्षा...

माझ्या एका तरूण मित्राच्या ऑफिस ग्रुपबरोबर अभयारण्य बघायला जायचा बेत ठरला. माझी तयारी करून भेटीच्या ठिकाणी ठरल्यावेळी पोचलो. एकेक करून माझ्या मित्राच्या मित्र-मैत्रिणी आणि त्यांची लहान लहान मुले येऊ लागली. बघता बघता ३५-४० जणांचा गट जमला. निघे तोपर्यंत जुजबी ओळखी झाल्या. त्यातल्या काही जणांची निसर्गभ्रमंतीची ओढ पाहून मला आनंद वाटला. दळ मोठे असले तरी वेळेवर हलले! अभयारण्यात शिरेपर्यंत  साडे अकरा वाजले.

आता दरीतून खळखळत वाहणारी नदी दिसू लागली. अडीच तीन हजार फूट खोल दरीच्या बाजूने जाणार्‍या रस्त्याला दुसर्‍या बाजूच्या तेवढ्याच वर उंच चढलेल्या डोंगराने पोटात घेतल्याप्रमाणे वाटत होते. रस्याला लागून एका भल्या थोरल्या खडकाजवळची गर्दी पाहून आम्ही ही थांबलो. त्या खडकाचा गडगडत जाण्याचा प्रवास एकमेकांपासून दोन हात दूर असणार्‍या असमान उंचीच्या दोन छोट्या बुरुजांनी रोखला होता. रस्त्यापासून खडकाचा तळ दहा बारा फूट वर तर माथा चांगला तीस पस्तीस फूट तरी उंच वाटत होता. खडकाची रस्त्याकडची बाजू भल्या थोरल्या घसरगुंडीसारखी दिसत होती. खडकाला पादाक्रांत करणार्‍या वीरांमुळे डाव्या बुरुजाच्या बाजूने खडकाच्या माथ्यावर जाणारी एक पायावाट तयार झाली होती. आमच्या ग्रुपमध्येही बरेच मावळे होते. माथ्यावरून वेगवेगळ्या पोझेस देणार्‍यांचे फोटो काढण्यापेक्षा त्यांना खालून सांभाळायला सांगणार्‍या त्यांच्या घरच्यांच्या पोझेसचे आणि चेहर्‍याचे फोटो काढण्याचा मोह मला आवरला नाही! वर जाण्यापेक्षा त्यां दोन बुरुजांच्या मधून जाणार्‍या पायवाटेवर उभे राहून मी त्या खडकाला खालूनच जोखले. पायवाटेवर पुढे जाऊन मागच्या बाजून दगडाचे फोटो काढताना दुसर्‍या बुरुजाच्या आणि खडकाच्या खबदाडीत कधीतरी वापरले गेलेले घरटे ही दिसले. वर्दळ सगळी खडकाच्या समोर, डाव्या बुरुजाजवळ आणि त्याच्या माथ्यावर, घरट्याची जागा निवडणारा पक्षी हुशार!

थोड्या वेळाने जेवणासाठी आम्ही एका ठिकाणी थांबलो. वेगवेगळ्या पदार्थांनी भरलेली माझी थाळी गप्पा ऐकता ऐकताअ संपली. सगळे आवरून, काहींचे फोटो सेशन संपवून, तासाभराने पुढचा प्रवास सुरू झाला.

वळणावळणाचा रस्ता डोंगर माथ्याकडे चालला होता. आजूबाजूला महाकाय डोंगर रांगा होत्या. एका खिंडिनंतरच्या वळणानंतर डोंगरात एक मोठी घळ होती आणि तिथे तुषारांवर इंद्रधनुष्य दाखवत एक धबधबा बोलावत होता. आम्ही तिथे न थांबतो तरच नवल होते. परत एकदा फोटो सेशन झाले. तीस चाळीस फुटांवरून पडणारे पाणी दगडांवर आपटत, फेसाळत पुढे जात होते. धबधब्याच्या खाली जाणे तर शक्यच नव्हते. शक्य तेवढ्या जवळ जाऊन थंडगार पाणी अनुभवून मी बाहेर आलो आणि किनार्‍याला लागून असलेली वेगवेगळी जंगली फुले पहात होतो. प्रवाहाच्या दिशेने थोडे पुढे गेल्यावर जांभळ्या रंगाच्या जंगली फुलांच्या छोट्या गालीच्याने माझी वाट अडवली. मध्येच एखादी एखादी निळी गुलछडी ही उभी होती. मग मला आठवले की वाटेत काही काही डोंगर उतार मधे मधे जांभळ्या रंगाचे दिसत होते ती हीच फुले असणार!

सगळे होईपर्यंत पाच वाजले. काहींचे डोके दुखू लागले होते तर काहींना अंधाराच्या आत परतायचे होते तर काहींनी लहान मुलांची कारणं देत मुक्कामापाशी परत जायची टूम काढली. दुसर्‍या दिवशी परत उठून आणखी काही ठिकाणे पहायची होती. त्यामुळे परतीच्या मागणीकर्‍यांच जय झाला.

पहिल्या दिवशी तरी अभयारण्यातून फार काही न पहाता परतावे लागत असल्याने मी थोडा अस्वस्थ होतो. एकंदरीत मोठा ग्रुप, वेगवेगळा वयोगट, वेगवेगळी आवड ह्यामुळे असेल आणि उद्याचा दिवस ही आहेच असे म्हणून मी मनाचे समाधान करून घेत मागे पडणारा निसर्ग पाहू लागलो. दोन डोंगरच्या उतरणीपैकी एकाच्या मागून एक भला थोरला सुळका वर आला होता आणि त्या सुळक्यामागे आणखी एक महाकाय डोंगर होता. संधी प्रकाशामुळे पूर्वेला असणार्‍या डोंगररांगा आकाशाचाच भाग झाल्यासारख्या भासत होत्या. खोल समुद्रात जशी आकाशाची व्याप्ती जाणवते तसेच होत होते. पहावे तिकडे महाकाय डोंगर रांगा! असेच चालत जाऊन ह्या डोंगर रांगामध्ये हरवून जावे असे वाटते होते.

मुकाम स्थळी पोचून आवरून होईपर्यंत हॉटेल मधून मागवलेले जेवण ही आले. जेवणानंतर आईसक्रीम ही आणले गेले. गप्पा हास्य विनोदाच्या आवाजात एकाने उभे राहून सगळ्यांना शांत केले आणि सर्वांना प्रश्न केला "आजचा दिवस कोणा कोणाला आवडला?" जवळ जवळ सगळ्यांनीच जल्लोष करत हात उंचावले. सगळ्यांना शांत करून टाळ्या वाजवत तो म्हणाला "मला जरा ही आवडला नाही! आवडण्याचे तर सोडाच मला तर मी इथे आलो त्याचेच वाईट वाटत आहे. का माहीत आहे?" आता काय बाहेर येणार ह्या चिंतेने सगळ्यांच्या चेहार्‍यावर प्रश्न चिन्ह दिसू लागले. त्यानेच मग उत्तर द्यायला सुरवात केली "अभयारण्याला भले संरक्षण संवर्धनाचा संदेश द्यायचा असेल पण आपल्यासारख्यांनी तो घेतला तर ना! आपण आलो बारा तेरा गाड्यांमधून, दोन्ही वेळेला जेवलो थर्माकोल-प्लास्टिक कोटेड थाळ्या आणि प्लास्टिक चमचे वापरून, दिवस्भर पाणी प्यायलो प्लास्टिकच्या छोट्या बाटल्यांमधून, इथे ही परतल्यावर आपल्याला साधा ओला-सुका कचरा ही वेगळा करता येत नाही?" आता सागळ्यांना त्याचा रोख कळला आणि वातावरण आणखी गंभीर झाले. तो पुढे म्हणाला "अभायरण्यात येऊन प्राणी - पक्षी पहाणे तर सोडाच आपण तर दिसणार्‍या झाडा फुलांची दखल ही घेतली नाही. उद्याचाही दिवस फक्त फोटो आणि नावापुरती अभयारण्याची सहल ह्यासाठी ज्यांना घालवायचा असेल त्यांच्या बरोबर मला यायचे नाही. मी उद्या वेगळे फिरयाला जायचे ठरवले आहे आणि माझ्या बरोबर येण्यास इच्छुक असणार्‍यांना आजच्या दिवसात काय खास निसर्ग निरिक्षण केले त्याची माहिती द्यायला लागेल आणि मी जास्तीत जास्त तीनच जणांना माझ्याबरोबर घेऊन जाईन!"

ह्या परिक्षेत पास होऊन माझी जागा राखण्यासाठी माझ्याकडे बर्‍यापैकी माहीती आहे असे वाटून मला एकदम हायसे वाटले!

No comments:

Post a Comment