"पण मला हो म्हणून ही तू का आला नाहीस, ते आधी सांग"
"मी येतो असे म्हटलेच नव्हते. त्या तीन दिवसांच्या ट्रीपला मी येत नाही म्हणून सुद्धा तू परत परत आग्रह करतच राहिलास म्हणून मी फोनवर तुला म्हटले की बरं तू मला संगीतलेस आणि मी ऐकलं!"
"हे आता तू शब्दाचा कीस पाडत आहेस. इतक्या वर्षांनी माझ्या शब्दाला तू किती महत्त्व देतोस ते कळले. आणि तू आला नाहीस म्हणून तुझी धाकटी मुलगी ही घरी थांबली."
"पण तुला हे माहिती आहे का की तिने बॅग ही भरली होती. शेवटच्या दहा मिनिटे आधी तिचा तिने निर्णय बदलला. आम्ही सगळ्यांनी तिला समजावले. मी तर तिच्या एकटीशी ही बोललो की आई आणि ताई ही जात आहेत, तुझ्या आवडीचे दोन्ही काका आहेत, इतरही बरीच मुले आहेत, समुद्र आहे, तुला नक्कीच मजा येईल, तर तू जावेस असे मला वाटते. मी तिला असे ही विचारले की मी गेलो असतो तर? त्यालाही तिने चक्क नकार दिला होता आणि वर म्हणाली तू जा ना मी रहाते एकटी!"
"पण तू आला असतास तर तिला काही पर्याय राहिलाच नसता. तशी ही ती एकटी एकटी रहाते. गप्पा मारत नाही. अशा ट्रिपमधून तिला ही चार लोकं भेटले असते, नवी मैत्री झाली असती. पण तुला तुझ्या मतांच्या पलिकडे मुलीचा विचार करावा असे ही वाटले नाही."
"आता तू सगळे खापर माझ्यावर फोडतो आहेस. मी तुला सांगितले की मी तिला समजावायचा प्रयत्न केला म्हणून"
माझ्या दोन मित्रांचे हे संभाषण पुढे जाईना तेंव्हा अचानक माझी साक्ष काढण्यात आली!
"तू गप्प का? तुला वाटत नव्हते का ह्याने यावे असे? मुलीसाठी तरी ह्याने स्वतःचा हेकेखोरपणा जरा बाजूला ठेवायला हवा होता की नाही?"
खरे तर तो घरी राहिला ह्याचे मला जराही नवल वाटले नव्हते आणि त्याची मुलगी ही अगदीच लहान नाही चांगली सातवीत आहे. थोडी लाजते, बुजते पण ओळख असेल तर बोलते. माझा मित्र जरी सगळ्याच गॅदरिंगला येत नसला तरी ती दरवेळी तिच्या आई आणि ताईबरोबर येते सगळीकडे. ह्याचवेळी तिने असे का केले आणि त्यात माझा मित्र न येण्यामुळेच असे झाले असेल का हे सांगता येणे कठीण होते. पण माझ्या दुसऱ्या मित्राचा राग खरोखरच त्या मुलीला विचारात घेऊन होता की आमचा मित्र त्याची मर्जी असल्याशिवाय नुसते आम्ही म्हटले म्हणून कुठे ही येत नाही ह्यावर होता हे ही मला कळत नव्हते. ह्या संभ्रमात मी कोणाचीच बाजू घेऊ इच्छित नसल्याने नुसताच सुस्कारा सोडला.
तरी माझे मत गृहीत धरून मित्राने परत तोफ डागली!
"हे समजून घे की तुझी मुलगी डीट्टो तुझ्यासारखी होत आहे. पुढे जाऊन तुलाच त्रास होईल. एक लक्षात घे की पालकांच्या चुकांमुळे मोठी होऊन मुले ही चुकीचे निर्णय घेतात. हल्लीच मी एक रिपोर्ट वाचला त्यात ड्रग घेण्यामागे मुलांबाबतचे पालकांचे चुकीचे निर्णय हे ही एक कारण दिले आहे. तू जे सारखं ऐकवतोस ना की जबरदस्ती न करता दरवेळेस मुलांना पाहिजे ते तुम्ही करू देता, बघ ती मोठी होऊन समाजात वावरताना भांबावेल आणि इतर प्रॉब्लेम झाले की तुलाच ब्लेम करेल तेंव्हा कळेल!"
आता मात्र मी मधे पडलो "अरे तू एकदम टोकाला जात आहेस. त्याची मुलगी चांगले गाते, भरपूर वाचते, गणितात ही चांगले करत आहे. हे सर्व आई बाबा तिला वेळ देतात म्हणूनच शक्य आहे ना! आणि ती ह्याच वेळी आली नाही. आपण एवढी तिची काळजी करत असू तर त्यासाठी काही ऍक्शन घेतली नाही तर ह्याला नुसतेच वॉर्न करून सोडले तर आपण आपली जबाबदारी झटकून टाकली असे होईल. आपण ह्याला शिक्षा देण्यासाठी ह्याच्या घरीच ट्रिप नंतरचे गेट टुगेदर करू. परत मुलं ही एकत्र येतील आणि एकत्रितपणे फोटो ही बघू मस्त! म्हणजे तिलाही कळेल तिने काय मिस केले ते! शेवटी म्हटले आहेच की it takes a village to raise a child!"